Soybean Market Price: सोयाबीनला का मिळत आहे हमीभावापेक्षा देखील कमी दर? उत्पादनात घट तरीदेखील दर कमी! काय आहेत कारणे?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market Price:- खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस ही महत्त्वाची पिके असून यावर्षीच्या नवीन हंगामातील सोयाबीन आणि कापूस ही दोन्हीही पिके विक्रीकरिता बाजारपेठेत दाखल होऊ लागले आहेत. यावर्षी उशिरा आलेला पाऊस व त्यातच ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दिलेला मोठा खंड, सोयाबीनवर झालेला विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट आल्याचे सध्याचे चित्र आहे.

परंतु असे असताना देखील जर सध्या सोयाबीनचा बाजारभाव पाहिला तर तो हमीभावापेक्षा देखील कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे साहजिकच मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की उत्पादनात घट असताना देखील हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनला कमी दर का मिळत आहे? यामागे देखील अनेक प्रकारचे कारणे आपल्याला सांगता येतील व त्याबद्दलचीच माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 सध्या सोयाबीनला किती मिळत आहे बाजारभाव?

केंद्र सरकारच्या माध्यमातून सोयाबीन साठी चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव म्हणजेच एमएसपी जाहीर करण्यात आलेली असताना देखील राज्यातील बाजार समित्यांमध्ये नवीन सोयाबीनला चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटलचाच दर मिळताना दिसून येत आहे. यामध्ये जर आपण गेल्या वर्षीच्या तुलनेचा विचार केला तर तब्बल क्विंटल मागे सहाशे ते आठशे रुपयांनी दर कमी मिळत आहे.

 खाद्यतेल आयात ठरत आहे सोयाबीन बाजारभावाला मारक?

केंद्र सरकारचे जे काही खाद्यतेलाचे आयात धोरण आहे त्याचा परिणाम सोयाबीन बाजारभावावर दिसून येत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी खाद्यतेल आयातीवरील शुल्क हे 35 टक्यावरून 5.50% पर्यंत आणले व त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर खाद्यतेलाची आयात झाली व त्यामुळे सोयाबीनचे देशांतर्गत भाव पडले.

जर आपण सोयाबीन बाजारभावावर परिणाम करणाऱ्या घटकांचा विचार केला तर ते प्रामुख्याने सोयातेल व सोयापेंड यांच्या एकंदरीत बाजारपेठेतील स्थितीवर अवलंबून असते. खाद्यतेल आयातीवरील शुल्क कमी केल्यामुळे देशात विक्रमी प्रमाणात आयात झाली मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास 22 टक्क्यांनी आयात जास्त झाली.

त्यामुळे तेलाचे भाव देखील घसरले व सोयाबीनचे भाव कमी झाले असे देखील या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. जर आपण सोयाबीन व सूर्यफूल तेलाच्या आयातीची स्थिती पाहिली तर नोव्हेंबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये तब्बल 155 लाख टन खाद्यतेलाच्या आयात करण्यात आली.

तेलाचे भाव बाजारपेठेमध्ये वाढायला लागतात तेव्हा सरकारच्या माध्यमातून तेलाची आयात करण्यात येते व मागच्या वर्षी 18 लाख टन सूर्यफूल तेलाची आयात करण्यात आली होती व यावर्षी ते 28 लाख टनांपर्यंत पोहोचली आहे म्हणजेच यामध्ये दहा लाख टनाची वाढ झाली आहे.

 सोयाबीनचे उत्पादन घटण्याची शक्यता

यावर्षी मोसमी पावसाचा विचार केला महाराष्ट्र मध्ये यावर्षी पावसाने उशिरा एन्ट्री केली होती व त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांच्या पेरण्या रखडल्या होत्या व त्यानंतर जुलै महिन्यात पाऊस झाला व खरिपाच्या पेरण्यांनी  वेग घेतला. परंतु त्यानंतर मात्र ऑगस्टमध्ये पावसाने खूप मोठा खंड दिल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम पिकांच्या वाढीवर झाला.

याच कालावधीमध्ये सोयाबीन पिकावर चारकोल रुट तसेच चक्रीभुंगा, उंट व केसाळ तसेच पिवळा मोझॅक यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे देखील याचा विपरीत परिणाम सोयाबीन पिकावर जाणवला. या सगळ्या परिस्थितीचा सोयाबीन उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्याचे देखील जाणकारांचे म्हणणे आहे.

 सोयाबीनचे उत्पादन कमी तरी देखील बाजारपेठेत का मिळत आहे कमी बाजारभाव?

यावर्षी सोयाबीनचे उत्पादन घटेल असे संकेत मिळत असताना देखील हमीभावापेक्षा कमी बाजारभाव सोयाबीनला मिळताना दिसून येत आहे. या परिस्थितीला केंद्र सरकारचे खाद्यतेल आयातीचे जे काही धोरण आहे तेच कारणीभूत असल्याची जाणकारांचे म्हणणे आहे.

एवढेच नाही तर यावर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवरील ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांमध्ये देखील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन येण्याची शक्यता आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे भाव घसरतात व त्याचा परिणाम हा आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये देखील जाणवतो. त्यामुळे या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची गरज असल्याचे देखील म्हटले जात आहे.