लोकसभा निवडणुक पक्ष फोडणाऱ्यांना आरसा दाखवेल ! महायुतीला मोठा फटका; ओपिनियन पोलमध्ये अजित पवार अन शिंदे गटाला फक्त ‘इतक्या’ जागा,

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loksabha Election : पाच वर्षांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत लोकशाहीचा महाकुंभ सजला आहे. देशात लोकसभेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येत्या तीन दिवसात अर्थातच 19 एप्रिल पासून 18 व्या लोकसभेसाठी मतदानाला सुरुवात होणार आहे. संपूर्ण देशात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार असून आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्णत्वास जाणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात महायुती मधील घटक पक्षांनी आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. यंदाची लोकसभा निवडणूक ही महाराष्ट्रासाठी विशेष महत्त्वाची ठरणार आहे.

याचे कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. महाराष्ट्रातील दोन मोठे पक्ष फुटले आहेत. साडेतीन वर्ष सत्तेत असलेले सरकार कोसळले आहे. शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शिंदे गट शिवसेना असे दोन गट पडले आहेत.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट झाले आहेत. यापैकी शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट शिवसेना हे भाजपा समवेत सत्तेत आले आहेत. दरम्यान या राजकीय घडामोडीनंतर पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामुळे यंदाची निवडणूक खूपच चुरशीची ठरत आहे.

अशातच आता टीव्ही नाईन या वृत्तसंस्थेचा ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलमधून एक शॉकिंग आकडेवारी समोर आली आहे. या ओपिनियन पोलमध्ये महायुतीला मोठा फटका बसू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, आता आपण टीव्ही नाईन या वृत्तसंस्थेचा ओपिनियन पोल नेमका काय अंदाज देत आहे हे थोडक्यात जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातील जनतेचा कौल कोणाला 

या ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात महायुतीमधील अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा सर्वाधिक जागा जिंकण्याची शक्यता आहे.

पण, एकसंध राष्ट्रवादीमधून बाहेर पडलेल्या अजितदादा यांच्या गटाला यंदाच्या निवडणुकीत काही जागेवर विजय मिळवता येणार नसल्याचा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्ष भाजपानंतर अधिक जागा जिंकणारा पक्ष ठरणार आहे. यानंतर मग शरद पवार गट आणि काँग्रेसचा नंबर लागणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला मात्र यंदाच्या निवडणुकीत फारशा जागा जिंकता येणार नसल्याचा दावा या ओपिनियन पोल मध्ये होत आहे.

कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार ?

भारतीय जनता पक्ष यंदा 25 जागांवर विजय मिळवेल. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे 10 खासदार विजय होतील. काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रत्येकी पाच जागा मिळतील. तसेच शिंदे गटाला या निवडणुकीत तीन जागा मिळण्याची शक्यता आहे.

मात्र अजित पवार यांच्या गटाला एकही जागा या निवडणुकीत मिळणार नाही असा अंदाज या ओपिनियन पोल मध्ये व्यक्त करण्यात आला आहे. यावरून यंदाच्या निवडणुकीत पक्ष फुटीला लोकांनी अमान्य केले असल्याचे दिसत आहे. तथापि, हा फक्त एक ओपिनियन पोल असून प्रत्यक्षात निकाल काय लागणार हे 4 जूनलाच समजणार आहे.