शिर्डीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये बंड, आता मविआचा ‘हा’ बडा नेता म्हणतोय, उमेदवार बदला नाहीतर….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shirdi Lok Sabha Election : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये दररोज काही ना काही नवीन घडामोड पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात देखील तशीच परिस्थिती तयार होत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने अहमदनगर आता राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनत आहे. साऱ्या राज्याचे लक्ष आता नगरकडे वळले आहे. खरेतर शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे.

तसेच महाविकास आघाडीकडूनही जागा ठाकरे यांच्या गटाला मिळाली असून ठाकरे यांच्या शिवसेनेने या जागेवरून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट दिलेले आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये वाकचौरे यांना तिकीट दिल्यामुळे बंडाची ठिणगी पडू पाहत आहे. त्यामुळे आता शिर्डीकडे राजकीय विश्लेषकांच्या नजरा आहेत.

काँग्रेसमधील उत्कर्षा रूपवते यांनी वाकचौरे यांना तिकीट दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक, उत्कर्षाजी या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. ठाकरे गटाने या जागेवरून उमेदवार दिलेला आहे मात्र तरी देखील त्यांनी शिर्डीच्या जागेचा आग्रह काही सोडलेला नाही.

त्यांनी आता माजी खासदार वाकचौरे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी असून काँग्रेसने इथे उमेदवार देऊन मैत्रीपूर्ण लढत करावी अशी मागणी केली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की रूपवते यांनी ठाकरे गटाने या जागेवर उमेदवार जाहीर केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांची भेट सुद्धा घेतली होती.

यामुळे त्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार अशा चर्चाही नगरच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळाल्या होत्या. दरम्यान त्यांनी यावर देखील मौन सोडले आहे. या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्यात की, प्रकाश आंबेडकर यांची भेट फक्त मार्गदर्शन घेण्यासाठी होती.

मी काँग्रेसमध्येच आहे, परंतु महाविकास आघाडीने शिर्डीच्या उमेदवारी बाबत पुनर्विचार करावा अन्यथा वेगळा विचार करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. एकंदरीत उत्कर्षाजी यांनी शिर्डी मध्ये बंड पुकारण्याची तयारी दाखवली आहे. ठाकरे गटाने दिलेल्या उमेदवाराविरोधात मतदार संघात खूप मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच ज्यांनी ठाकरे आणि काँग्रेस सोबत गद्दारी केली त्यांनाच पुन्हा तिकीट दिले असल्याने पक्षांतर्गत देखील मोठी नाराजी असल्याचे मत व्यक्त केले आहे. यामुळे उत्कर्षाजी यांनी यावेळी एकतर उमेदवार बदला नाहीतर भिवंडी आणि सांगली प्रमाणे येथे मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या अशी मागणी केली आहे.

यावेळी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी नमूद केले असून निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी पुढाकार घेतला पाहिजे अशी भावनिक साद काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे घातली आहे.

यामुळे आता येथे सांगली आणि भिवंडी प्रमाणे मैत्रीपूर्ण लढत होणार का किंवा महाविकास आघाडी आपला उमेदवार बदलणार का ? हे पाहण्यासारखे राहणार आहे.

उत्कर्षाजी यांच्या या भूमिकेमुळे मात्र शिर्डीत महाविकास आघाडीत बंडाची ठिणगी पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता मात्र हा बंड उठावात परिवर्तित होणार की पक्षश्रेष्ठी यावर काही तोडगा काढणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.