नगर दक्षिणमध्ये राम शिंदे ठरणार किंगमेकर ! देवेंद्र फडणवीस दूर करणार विखे-शिंदे यांच्यातला वाद ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vikhe Vs Aamdar Ram Shinde : यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचे शंखनाद नुकतेच वाजले आहेत. निवडणूक आयोगाने नुकत्याच निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे सध्या संपूर्ण देशभर राजकीय वातावरण तापलेले आहे. नगर दक्षिणमध्ये सुद्धा राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या जागेसाठी महायुतीने उमेदवार जाहीर केला आहे. महायुतीकडून भाजपाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना या जागेवरून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.

सुरुवातीला सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारी बाबत संभ्रमावस्था होती. त्यांना भाजप पक्षश्रेष्ठी यावेळी होणाऱ्या निवडणुकीत तिकीट देणार नाही अशा चर्चा होत्या. मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा तिकीट देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.

मात्र असे असले तरी सुजय विखे यांच्या पुढे यंदाची लोकसभा निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. अजून या जागेवर महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. तथापि या जागेवरून निलेश लंके किंवा त्यांची धर्मपत्नी राणी लंके यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशा चर्चा आहेत.

पण महाविकास आघाडीचे आव्हान मोडीत काढण्याआधी सुजय विखे यांच्यापुढे आपल्या पक्षातील नेत्यांचीच नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. त्यांना विधानपरिषद आमदार राम शिंदे यांची नाराजी दूर करावी लागणार आहे. खरंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश घेतला.

भाजपाने सुजय विखे यांना गेल्या वेळी नगर-दक्षिणमधून पहिल्यांदा उमेदवारी दिली. त्यावेळी आमदार राम शिंदे यांनी सुजय विखे यांच्यासाठी मत मागितली होती. त्यावेळी आमदार राम शिंदे हे पालकमंत्री होते. यामुळे सुजय विखे यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर अधिक होती. विशेष म्हणजे ही जबाबदारी त्यांनी चांगल्या तऱ्हेने पार पाडली. गेल्यावेळी सुजय विखे हे पहिल्यांदा खासदार बनलेत.

यात रामभाऊंची देखील मोठी मेहनत होती. परंतु 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार राम शिंदे यांनाच पराभवाचा सामना करावा लागला. शिंदे यांनी आपल्या पराभवाचे सारे खापर विखे पिता-पुत्र यांच्यावर फोडले. तसेच त्यांनी फडणवीस यांच्याकडे याची तक्रारही केली. तेव्हापासून विखे आणि शिंदे यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. सध्या नगर भाजपा राम शिंदे आणि विखे पाटील अशा दोन गटात विभागली गेली आहे.

जिल्ह्यातील भाजप पक्षात शीतयुद्ध सुरू असून भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते देखील विखे यांच्यापासून अंतर ठेवून आहेत. विशेष म्हणजे आमदार राम शिंदे हे जोवर विखे यांना तिकीट मिळाले नव्हते तोपर्यंत नगर दक्षिणमधून निवडणूक लढवण्याची आस बाळगून होते. पण भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा सुजय विखे यांना नगरदक्षिणचा किल्ला लढवण्याची जबाबदारी दिलेली आहे.

दरम्यान उमेदवारी मिळाल्यानंतर सुजय विखे आणि त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील हे सावध भूमिकेत आहेत. विखे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर लगेचच विखे पिता-पुत्र यांनी आमदार रामभाऊंची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न देखील सुरू केला आहे. सुजय विखे यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपाच्या पहिल्याच आढावा बैठकीत भाजप कार्यकर्त्यांची माफी देखील मागितली.

त्यावेळी त्यांनी जाहीर माफीनामा सादर केला. विखे यांनी पक्ष कार्यकर्त्यांची माफी मागितल्यानंतर रामभाऊंनी देखील सुजय विखे यांची उमेदवारी मला मान्य असल्याचे जाहीर करत त्यांच्यासाठी काम करू, सुजय विखे यांना विजयी बनवू असे म्हटले. यानंतर विखे यांनी राम शिंदे यांची भेटही घेत बंद दाराआड चर्चा केली. अशातच आता रामभाऊंची नाराजी दूर करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलल गेलं आहे.

विखे आणि शिंदे यांच्यातला हा वाद देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला असल्याचे समोर येत आहे. या ठिकाणी एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे की, आमदार राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे खूपच जवळचे नेते आहेत. हेच कारण आहे की विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही त्यांना विधान परिषदेतून आमदारकी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे राम शिंदे आणि विखे यांच्यातील वाद मिटवणार का ? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.