Farmer Success Story: वांगे,पपईतून शेतकऱ्याने मिळवले सात लाखाचे उत्पन्न! वाचा अशा पद्धतीने केले उत्तम नियोजन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story:- पिकांपासून भरघोस उत्पादन मिळवणे आता शेतकऱ्यांसाठी खूप मोठी गोष्ट राहिलेली नाही. कारण शेतकरी आता शेतीच्या बाबतीत अनेक आधुनिक पद्धतींचा वापर करत असून अनेक तंत्रज्ञान वापरामध्ये तरबेज झालेले आहेत. परंतु बाजारपेठेतील किंवा शेतीमालाचा भाव ठरवणे शेतकऱ्यांच्या हातात नसल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात भरघोस उत्पादन घेऊन देखील आर्थिक फटका बसतो व  खूप मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.

परंतु जर बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला जर चांगला भाव मिळाला तर शेतकरी अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखात उत्पन्न मिळवू शकतात हे मात्र निश्चित. याच मुद्द्याला धरून जर आपण नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात असलेल्या ब्राह्मणगाव या गावच्या एका युवा शेतकऱ्याची कहाणी पाहिली तर अडीच ते तीन एकर क्षेत्रामध्ये वांगी आणि पपई लागवड केली आणि त्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळवले. याच शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 ब्राह्मणगावच्या शेतकऱ्याने केली किमया

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील प्रदीप मधुकर अहिरे या तरुण शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रामध्ये वेलकम 46 जातीची पपईची लागवड केली व दोन एकर क्षेत्रात देशी रवय्या जातीच्या वांग्याची लागवड केली. या दोन्ही पिकांचे व्यवस्थापन त्यांनी अत्यंत आधुनिक पद्धतीने व व्यवस्थित केले व त्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पादन हाती घेतले आहे.

दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले व त्यांच्यावरचा आधाराचा हातच गेल्यानंतर मात्र परिस्थिती खूप बिकट बनली होती. परंतु न हरता त्यांनी स्वतःच्या खांद्यावर शेतीची जबाबदारी घेतली व कांदा आणि टोमॅटोला पर्याय म्हणून आणि वाढती मजुरीची समस्या व मजूर शोधण्यासाठी होणारी धावपळ या बाबी डोळ्यासमोर ठेवत त्यांनी देशी रवैया वांगे व पपईची लागवड करण्याचे निश्चित केले.

याकरिता त्यांनी एक जानेवारीला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून एक एकर क्षेत्रामध्ये वेलकम 46 जातीची पपईची लागवड केली व त्याच्या जवळील शेतामध्ये दोन एकर क्षेत्रात देशी रवैया जातीच्या वांग्याची लागवड ही एक जूनला केली. नंतर व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्व बाजूने व्यवस्थित लक्ष केंद्रित केले व भरघोस उत्पादन मिळण्याच्या दृष्टिकोनातून खूप चांगले प्रयत्न केले.

जेव्हा त्यांचे वांग्याचे उत्पादन सुरू झाले तेव्हापासून तर सध्या रोज त्यांना 70 ते 80 क्रेट वांग्याचे उत्पादन दोन एकर क्षेत्रामध्ये होत असून एक एकर क्षेत्रातील पपईचे उत्पादन 40 ते 50 क्रेट इतके निघत आहे. दहा ते बारा मजुरांच्या साह्याने वांगे आणि पपई तोडण्याचे काम केले जाते. जर वांगे आणि पपई या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक उत्पन्नाचा विचार केला तर पीक लागवड, व्यवस्थापनाचा खर्च आणि मजुरी व बी बियाणे यावरील खर्च वजा जाता त्यांनी देशी रवैया वांग्याच्या उत्पादनातून तब्बल पाच लाख रुपये तर पपईच्या उत्पादनातून दोन लाख रुपये  उत्पादन मिळण्याचा आशावाद व्यक्त केलेला आहे.

जर आपण साधारणपणे बागलाण तालुक्याचा विचार केला तर या परिसरामध्ये कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु कांद्याच्या बाजारभावात सातत्याने होणारे घसरण व मजूर टंचाई तसेच मजुरीचे दर पाहता या पिकाला फाटा देत वांगे आणि पपई लागवडीतून प्रदीप अहिरे यांनी भरघोस उत्पादन मिळवले आहे.

 वांगे आणि पपई लागवडीचा एकूण खर्च आणि मिळणारा बाजार भाव

देशी रवैया जातीच्या वांग्याची गुजरात राज्यामध्ये खूप मागणी असते व साधारणपणे 50 रुपये किलो दराने हे वांगे त्या ठिकाणी विक्रीला पाठवले जातात. बी विरहित पपई लागवड केली असल्यामुळे व ती चवीने गोड असल्यामुळे तिची देखील मागणी चांगली आहे व बारा ते पंधरा रुपये किलो दराने पपईची विक्री होत आहे.

त्यांचा वांगे लागवडीचा खर्च पाहिला तर तो दोन एकर करिता एक लाख रुपये आणि वेलकम 46 जातीच्या पपई लागवडीकरिता एक एकर करिता एक लाख रुपये इतका खर्च आलेला आहे. सध्या त्यांना देशी रवैया वांग्याला 50 ते 60 रुपये किलो दर मिळत असून पपईला 12 ते 15 रुपये किलो इतका दर मिळत आहे.