सावधान ! देशासह राज्यात जेएन-१ या नव्या व्हेरियंटच्या रुग्णात वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health News : देशासह राज्यात जेएन-१ या नव्या व्हेरियंटच्या रुग्णात वाढ होत आहे. रविवारी राज्यात ९ जेएन-१ रुग्णांची नोंद झाल्याने आता राज्यात जेएन-१ व्हेरियंट रुग्णांची संख्या १० झाली आहे. ठाणे, पुणे आणि अकोला याठिकाणी या रुग्णांची नोंद झाली आहे.

यात पुण्यातील एका रुग्णाचा प्रवास इतिहासतून हा रुग्ण अमेरिकेतून आला असल्याची नोंद आहे. तसेच यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा रुग्ण आढळला होता. रुग्णांची लक्षणे सौम्य असून ते उपचारातून बरे होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

रविवारी ठाणे मनपा क्षेत्रात ५ रुग्ण, पुणे मनपा क्षेत्रात २, तर पुणे ग्रामीण क्षेत्रात १ आणि अकोला मनपा क्षेत्रात १ अशा नऊ रुग्णांची नोंद करण्यात आली. यापैकी ८ पुरुष, तर १ महिला आहे.

यातील १ रुग्ण ९ वर्षांचा लहान मुलगा असून १ जण २१ वर्षांची तरुणी आहे, तर १ जण २८ वर्षांचा तरुण असून उर्वरित ६ जण ४० वर्षांवरील नागरिक असल्याचे सांगण्यात आले. यातील ८ जणांनी कोविड लस घेतली आहे. हे सर्व घरात क्वारंटाईन राहत असल्याचे सांगण्यात आले. सर्वांना सौम्य लक्षणे असून सगळे रुग्ण बरे झाले आहेत.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

देशभर जेएन-१ या कोरोनाच्या नव्या सब व्हेरियंटमुळे खळबळ उडाली आहे. केरळनंतर आता महाराष्ट्रातदेखील रुग्ण आढळू लागले आहेत. आता राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

नागपूर अधिवेशनानंतर चाचणी केल्यानंतर कोरोना झाल्याचे आढळले. धनंजय मुंडे हे सध्या पुण्यातील शिवाजीनगर भागातील आपल्या निवासस्थानी क्वारंटाइन आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जगभर सध्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या महिन्याभरात जगात कोरोनामुळे तीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या २४ टक्क्यांनी वाढली आहे.

भारतातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. केरळमध्ये जेएन-१ व्हेरियंटचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आता महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमध्ये देखील एक रुग्ण सापडला आहे.

सुदैवाने दोन्हीही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. धनंजय मुंडे यांना गेल्या दोन दिवसांपासून खोकला असल्यामुळे पुण्यातील घरी आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यांना कोरोनची लागण झाली आहे.