भले शाब्बास पोरा…! नगरच्या शेतकरी पुत्रानं बापाच्या कष्टाची जाण ठेवली, आई-वडिलांच्या लग्न वाढदिवशी भेट दिली एमजी हेक्टर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती (Farming) क्षेत्रावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे भारतात अल्पभूधारक शेतकऱ्यांची (Farmer) संख्या सर्वाधिक आहे.

अल्पभूधारक शेतकरी शेतीत राब-राब राबून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत असतात, आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करतात. अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) कोपरगाव तालुक्याच्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याने देखील शेतीत काबाडकष्ट करून आपल्या मुलाला स्वताच्या पायावर उभे केले आहे.

मुलाने देखील आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची त्यांना एक अनमोल भेट दिली आहे. मौजे डाऊच खुर्द या गावात राहणारे यमाजी बाबुराव पुंगळ आणि त्यांच्या सौभाग्यवती अनुसया यमाजी पुंगळ यांनी अतिशय कमी शेतजमीन असतानादेखील आपल्या एकुलत्या मुलाला चांगले शिक्षण दिले.

पुंगळ दांपत्यास एकूण पाच मुली आणि एक मुलगा आहे. बाबासाहेब असं या मुलाचे नाव. पुंगळ दांपत्याने शेतीत अपार कष्ट करून बाबासाहेबांना चांगले शिक्षण दिले आणि बाबासाहेबांनी देखील आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची दखल घेत त्यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला एमजी हेक्टर गाडी (MG Hector Car) भेट म्हणून दिली.

शेतकरी आई-वडिलांच्या लग्न वाढदिवसाला शेतकरी पुत्राने लाखो रुपयांची एमजी हेक्टर गाडी भेट दिल्याने सध्या पंचक्रोशीत या तरुणाची मोठी चर्चा रंगली आहे. बाबासाहेबांनी दहावीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल चांदेकसारे येथे घेतले.

लहानपणापासून अतिशय हुशार असलेल्या बाबासाहेबांनी दहावीत चांगले गुण मिळवले आणि मग त्यांनी पुढील शिक्षणासाठी पुण्याचा रस्ता पकडला. दहावीत चांगले मार्क मिळाले असल्याने त्यांना पुण्यातील इंजीनियरिंग गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक या महाविद्यालयात मोफत प्रवेश मिळाला. येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एमआयटी येथे त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले.

बाबासाहेबांची घरची परिस्थिती हालाखीची असल्याने कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत बाबासाहेबांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांनी सुमारे वीस वर्षे पुण्यात नोकरी केली. अपार बुद्धिमत्तेचे धनी बाबासाहेबांनी यानंतर जवळपास 5 वर्ष विदेशात देखील नोकरी केली. त्यांना कोरियामध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली होती.

बाबासाहेब व त्यांच्या पत्नी निर्मला यांनी दोघांनी पंचक्रोशीतील मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने तसेच आपल्या परिसरातील मुलांचे जीवनमान उंचावले जावे म्हणून मोठ्या कष्टाने आधुनिक यंत्रचे स्पेअर पार्ट बनवण्याचा कारखाना सुरु केला. यामुळे पंचक्रोशीतील अनेक सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळाला.

आपल्या शेतकरी आई-वडिलांनी आपल्याला स्वतःच्या कष्टाने अगदी तळहाताच्या फोडा प्रमाणे सांभाळले, उच्च शिक्षण दिले आणि आज समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी काबाडकष्ट केले म्हणून बाळासाहेबांनी आपल्या आई-वडिलांना एक खास गिफ्ट देण्याचे ठरवले. यासाठी बाळासाहेबांनी आपल्या आई-वडिलांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या दिवशी एका कार्यक्रमाचे आयोजन केले.

या कार्यक्रमात सर्व नातेवाईक व आप्तेष्टांना बोलावले आणि आपल्या आई-वडिलांना एमजी हेक्टर गाडी गिफ्ट दिली. बाबासाहेबांनी दिलेले हे अनोखे गिफ्ट निश्चितच कौतुकास्पद आहे. शेतकरी बापाच्या कष्टाची उतराई बाबासाहेबांनी करण्याचा प्रयत्न केला आहे.