Farmer Success Story: गेल्या 24 वर्षापासून या शेतकऱ्याला आहे भुईमूग पिकाचा हातखंडा! उन्हाळी भुईमुगाचे मिळवतो एकरी 20 ते 22 क्विंटल उत्पादन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story:- शेतीमध्ये कुठलाही पिकाची लागवड केल्यानंतर त्याचे सगळ्या गोष्टींनी करायचे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा नेमका वापर करून शेतकरी भरघोस असे उत्पादन मिळतात. व्यवस्थापनामध्ये पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या टप्प्यात खूप वेगळ्या पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे असते या व्यवस्थापनाचा सकारात्मक परिणाम हा उत्पादन वाढीवर दिसून येतो.

महाराष्ट्राचे शेतकरी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करतात. यामध्ये खरीप हंगामात वेगळी तर रब्बी म्हणजेच उन्हाळी हंगामामध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड केली जाते. त्यामध्ये बरेच शेतकरी गेल्या कित्येक वर्षापासून एकाच पिकाची लागवड करतात व या पिकांमध्ये सातत्याने अभ्यास व अनुभवाने ते भरघोस उत्पादन देखील मिळवतात.

याच पद्धतीने जर आपण परभणी जिल्ह्याच्या केहाळ येथील मधुकर घुगे या शेतकऱ्याची यशोगाथा पाहिली तर त्यांनी भुईमूग शेतीमध्ये मास्टरी मिळवली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

घुगे हे गेल्या 24 वर्षांपासून भुईमुगाची लागवड करत असून यामध्ये त्यांनी  अभ्यास आणि अनुभवाच्या जोरावर भरघोस उत्पादन मिळवण्यात हातखंडा तयार केला आहे. घुगे योग्य नियोजनाने उन्हाळी भुईमुगाचे एकरी 20 ते 25 क्विंटल पर्यंत उतारा मिळवतात. नेमके ते भुईमूग पिकाचे व्यवस्थापन कसे करतात? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.

 कशी आहे घुगे यांची भुईमूग शेती?

परभणी जिल्ह्यातील केहाळ या गावचे रहिवासी असलेले मधुकर घुगे भुईमूग शेतीतील मास्टर म्हणून प्रसिद्ध आहेत. भुईमुगाची लागवड करण्यासाठी ते प्रामुख्याने भाभा अणुसंशोधन केंद्राने  अकोला, परभणी येथील कृषी विद्यापीठे व लातूर संशोधन केंद्राच्या माध्यमातून विकसित केलेल्या भुईमुगाच्या विविध वाणाची लागवड करण्याला ते प्राधान्य देतात.

साधारणपणे 2021 पासून ते भुईमूग शेती करत आहेत. भुईमुगाच्या लागवडीसाठी प्रामुख्याने टीएजी 73, टी जी 51, टीएलजी 45, टीएजी 24 यासारख्या वाणांचा वापर करतात. साधारणपणे या वाणाचा परिपक्वता कालावधी म्हणजेच काढणीसाठीचा कालावधी लागवडीनंतर 110 ते 115 दिवसांचा आहे. परंतु यामध्ये जातीनिहाय  थोडाफार प्रमाणात फरक पडू शकतो.

 कसे आहे घुगे यांचे भुईमूग लागवड तंत्र?

मधुकर घुगे शेतामध्ये एका वर्षाआड मेंढ्या बसवतात. तसेच घरच्या जनावरांचे शेणाचा वापर देखील खतासाठी करतात. परंतु दरवर्षी 39 ते 50 ट्रॉली शेणखताचा विकत घेऊन देखील ते वापर करतात व त्यामुळे जमिनीचे सुपीकता टिकून राहण्यास मदत होते.

जानेवारी महिन्यामध्ये पहिल्या भिजवणीकरिता तुषार सिंचनाद्वारे आठ तास पाणी देतात व पुढे तापमान, जमिनीचा मगदूर व पिकांची वाढ यानुसार पाण्याचे नियोजन करतात. खत व्यवस्थापनामध्ये एकरी तीन बॅग जिप्सम देतात व त्यानंतर वखराची पाळी देऊन मोकळ्या मातीचा थर भिजवण्यासाठी रात्री दोन तास तुषार सिंचनाच्या साह्याने पाणी देतात.

खत पेरणी करताना ते सकाळी तिफणीने खत पेरणी करतात. त्यामध्ये एकरी अर्धी बॅग पोटॅश, चार बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, दहा बॅग 10:26:26 व त्यासोबत गंधक, बोरॉन आणि मॅग्नेशियम चा वापर देखील करतात. एवढेच नाही तर बुरशीनाशक व जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया देखील केली जाते.

 लागवडीची पद्धत

भुईमुगाची लागवड ते टोकन पद्धतीने करतात व 25 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर टोकन पद्धतीने लागवड केली जाते व या पद्धतीत एका एकरमध्ये एक लाख 60 हजार ते एक लाख 70 हजार पर्यंत रोपांची एकरी संख्या ठेवली जाते. त्यामुळे उत्पादनात वाढ होते. तसेच कीड व रोग नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा भाग म्हणून भुईमूग पिका सभोवती मका आणि चवळी या सापळा पिकांची देखील लागवड करतात.

जर भुईमुगावर किडींनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडली तरच कीटकनाशकांची फवारणी केली जाते. या पिकासाठी ते सुक्ष्म अन्नद्रव्य किंवा विविध ग्रेडच्या खतांच्या दोन किंवा तीन वेळा फवारण्या करतात. विशेष म्हणजे पहिल्या अंतरमशागतीसाठी ते हात कोळप्याचा वापर करतात.

कारण पहिल्या अंतर मशागतीच्या वेळी जर बैल कोळपे वापरले तर रोपांना इजा होण्याची शक्यता असते. तसेच लागवड केल्यानंतर 35 ते 40 दिवसांनी या पिकाला आऱ्या सुटत असताना एका एकर साठी तीन बॅग जिप्समच्या दोन ओळींमध्ये वापर करतात. त्यानंतर तिफनला तागाचे वस्त्र गुंडाळतात व दोन ओळींमधून ते फिरवतात. यामुळे जिप्सम जमिनीमध्ये मिसळले जाते व आऱ्याना त्याचा फायदा होतो व फोल शेंगाचे प्रमाण कमी होते.

 काढणीचे नियोजन कसे करतात?

भुईमुगाचे पीक परिपक्व झाल्यानंतर चार ते पाच ठिकाणची झाडे उपटून त्याच्या शेंगा फोडून पाहिल्या जातात. यामध्ये जर 80% शेंगांची टरफले आतून काळी पडल्याचे दिसून आले तर काढणीला सुरुवात करतात. काढणी करताना जमिनीमध्ये शेंगा खुडू नयेत याकरिता काढणी सुरू करण्यापूर्वी रात्री दोन तास पाणी देऊन दुसऱ्या दिवशी भुईमूग उपटायला सुरूवात केली जाते. हे केल्यामुळे भुईमुगाच्या शेंगा जमिनीमध्ये खुडण्याची समस्या कमी होते.

 एकरी किती उत्पादन मिळवतात?

मधुकर घुगे हे रब्बी हंगामामध्ये भुईमुगातून एकरी बारा ते पंधरा क्विंटल आणि उन्हाळी लागवडीतून एकरी 20 ते 22 क्विंटल उत्पादन मिळवतात.