मनीषा ताईंनी कापूस आणि केळी पट्ट्यात घेतले मिरचीचे भरघोस पीक! 200 क्विंटल मिरची उत्पादनातून मिळवले 20 ते 25 लाख रुपये उत्पन्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्रातील सर्व जिल्हे वेगवेगळ्या पीक उत्पादनाच्या बाबतीत प्रसिद्ध असून शेतीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्याचे एक वेगळेपण आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर पश्चिम महाराष्ट्रात जास्त प्रमाणात उसाची लागवड होते. तर नाशिक जिल्हा हा द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जातो व या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष तसेच डाळिंब व कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.

अगदी या सोबत खानदेश पट्ट्यात जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो व या जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्याची विशेष ओळख ही केळीचे आगार अशी असून त्या खालोखाल कापूस या पिकासाठी हा पट्टा प्रसिद्ध आहे.

तसेच नंदुरबार जिल्हा हा खास करून मिरची आणि पपई लागवडीकरिता ओळखला जातो. याच खान्देश पट्ट्यातील जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुका असून अगदी तालुका स्तरावर जर पाहिले तर पारोळा तालुक्यामध्ये जास्त करून कपाशीचे पीक घेतले जातेच

परंतु भाजीपाला पिकांमध्ये मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणावर या पट्ट्यात काही वर्षांपासून घेतले जात असल्याचे चित्र आहे. याच पारोळा तालुक्यातील राजवड या गावच्या मनीषा पाटील या शेतकरी महिलेने मिरची आणि त्यासोबत खरबूज पिकाची लागवड केली व तीन एकरमध्ये जवळपास 25 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे मनीषा पाटील यांची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 मनीषा पाटील यांनी मिरची आणि खरबूज पिकातून मिळवले 25 लाख रुपये उत्पन्न

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात असलेल्या राजवड या छोट्याशा गावातील मनीषा पाटील या अगोदर गहू तसेच कापसासारख्या पारंपारिक पिकांच्या माध्यमातून शेती करत होत्या. परंतु होत असलेल्या खर्चाच्या मानाने मात्र हवे तेवढे आर्थिक उत्पन्न हाती लागत नसल्याने तोटा होत होता.

म्हणून त्यांनी या व्यतिरिक्त काही वेगळ्या पिकांची लागवड करण्याच्या उद्दिष्टाने मिरची आणि खरबुज पिकांची निवड केली व त्यांच्या घरच्या तीन एकर शेतीमध्ये त्यांनी मल्चिंग व बेडचा वापर करून मिरची व खरबूज या पिकांची लागवड केली.

लागवड केल्यानंतर त्यांनी रासायनिक खतांच्या वापरासोबतच शेणखताचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला व सेंद्रिय  खताच्या वापरामुळे सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत झाली व त्याचा परिणाम उत्पादन वाढीवर दिसून आला.

विशेष म्हणजे मनीषा ताईंनी मिरची पिकांसाठी खतांचे नियोजन करताना मात्र सेंद्रिय खतांच्या तुलनेने जास्त वापर केला व रासायनिक खते कमी प्रमाणात वापरले. तसेच फवारणी करिता दूध, अंडी आणि गोमुत्राचा वापर केला

यामुळे उत्पादनाचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारली व अधिकचे उत्पादन मिळण्यास मदत झाली. म्हणजे त्यांनी खरबूज आणि मिरची पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन हे सेंद्रिय पद्धतीने केल्यानेच त्यांना भरघोस उत्पादन मिळाले.

 चार तोड्यामध्ये मिरचीचे मिळाले 200 क्विंटल उत्पादन

आधुनिक आणि संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने मनीषा पाटील यांनी मिरचीचे नियोजन केले व पाच महिन्यांमध्ये मिरची पिकातून चार तोडे निघाले व यातून तब्बल दोनशे क्विंटल पर्यंत मिरचीचे उत्पादन मिळवण्यात त्या यशस्वी झाल्या.

एवढेच नाही तर खरबूज पिकातून देखील त्यांनी आतापर्यंत 25 टन  उत्पादन घेतले. या सर्व तीन एकर मधील मिरची आणि खरबूज पिकातून मिळालेल्या उत्पादनातून त्यांना 25 लाखांची कमाई झाल्याचे देखील मनीषा पाटील यांनी सांगितले.