कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल का दिलासा! सप्टेंबरमध्ये काय राहील कांदा दराची स्थिती? वाचा तपशील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यावर्षीचा हंगामामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही. त्यामुळे कांदा भावात वाढ व्हावी याकरिता शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केली होती व  यावर उपाय म्हणून सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आपण कांद्याचे स्थिती पाहिली तर साठवण केलेला कांद्याचे टिकवणक्षमता देखील खूप कमी असल्यामुळे कांदा खराब होत आहे. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झालेली आहे.

परंतु गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरामध्ये बऱ्यापैकी सुधारणा होताना दिसून येत आहे. त्या जर आपण कांद्याचे बाजार भाव पाहिले तर ते साधारणपणे दोन हजाराच्या आसपास किंवा त्यापुढे असून किरकोळ बाजारामध्ये 35 ते 40 रुपयांच्या पुढे कांद्याचे बाजार भाव गेले आहेत.

त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळताना दिसून येत आहे. परंतु त्यातच केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून केलेला स्टॉक हा खुल्या बाजारात विकणार असल्याचे समोर आले व त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली व हिरमोड देखील झाला.

 नाफेडची एन्ट्री कांदादराला ठरेल का मारक?

सध्या कांद्याचे दर वाढताना दिसून येत आहेत त्यामागे बरीच कारणे असून त्यातील प्रमुख कारण म्हणजे सध्या कांद्याचे आवक कमी झाली आहे. देशाच्या कांद्याच्या मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्यामुळे सध्याची स्थिती सकारात्मक दिसून येत आहे. तसेच बांगलादेश कडून कांद्याला मागणी होत असल्यामुळे कांद्याचे निर्यात देखील सुरू आहे.

परंतु या सगळ्या सकारात्मक बाबी असताना नेहमीप्रमाणे केंद्र सरकारने खोडा घालण्याचे काम केले असून केंद्रीय ग्राहक कल्याण विभागाच्या माध्यमातून नाफेडच्या स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारात विकण्याची जाहीर केले व कांदा दरवाढीला ब्रेक लागण्याचे सध्या चित्र निर्माण झाले आहे. परंतु जाणकारांच्या मताचा विचार केला तर नाफेड कडे सध्या तीन लाख टन एवढा कांदा स्टॉक केलेला आहे.

परंतु या तीन लाख टन कांद्यामुळे कांद्याचे दर घसरतील का? जर आपण देशाची दैनंदिन कांद्याची गरज पाहिली तर ती 50 हजार टन कांद्याचे आहे. या आकडेवारीवरून जर नाफेडने स्टॉक केलेला संपूर्ण तीन लाख टन कांदा जरी विकला तरी देशाला फक्त सात दिवस पुरेल एवढाच कांदा आहे. त्यामुळे नाफेडच्या कांद्याचा कांद्याच्या दरांवर काही परिणाम होणार नाही अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

 सप्टेंबरमध्ये काय राहील कांदा बाजार भावाची स्थिती?

जर आपण या खरीप हंगामातील कांदा लागवडीचा विचार केला तर ती बऱ्याच भागामध्ये खूप उशिराने झालेली आहे. तसेच जुलै महिन्यामध्ये खूप जास्त प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस झाल्यामुळे आणि आता ऑगस्टमध्ये जवळ पंधरा दिवसांचा खंड पडल्यामुळे याचा देखील विपरीत परिणाम खरीप हंगामातील कांद्यावर होऊ शकतो.

त्यामुळे कांद्याचे दर येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये आणखी वाढण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. जवळजवळ कांदा तीन ते चार हजार रुपयांचा टप्पा गाठेल अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे काही काळ तरी हे कांद्याचे भाव स्थिर राहण्याचा अंदाज देखील जाणकारांकडून व्यक्त केला गेला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात कांद्याच्या बाजार भावाबाबत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशीच शक्यता दिसून येत आहे.