Silk Farming : रेशीम कोष विक्रीतून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कमावले 35 कोटी! घेताहेत सरकारी अनुदानाचा फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Silk Farming :- सध्या महाराष्ट्रातील शेतकरी शेती करण्याच्या दृष्टिकोनातून खूप आधुनिक झाले असून तंत्रज्ञानाचा वापर आणि वेगवेगळ्या पिकपद्धतीचा अवलंब करून शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेत आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांना शासनाच्या माध्यमातून देखील मोलाची मदत मिळतांना दिसून येते.

अनेक योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येते व यातूनच शेतकऱ्यांना शेती संबंधित अनेक कामे करणे सुलभ होते. याचे जर उदाहरण घ्यायचे झाले तर आपल्याला बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे घेता येईल. कारण बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीची कास धरली व रेशीम कोष विक्रीतून जिल्ह्याला तब्बल 35 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले.

 बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विकले ११४२ मॅट्रिक टन कोष

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेशीम उत्पादनामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली असून यामध्ये   9 वर्षाचा उच्चांक मोडला आहे व रेशीम कोष निर्मितीमध्ये महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर बीड जिल्हा राहिला. 2022-23 मध्ये 3583 शेतकऱ्यांनी तुतीची लागवड केलेली होती. या सर्व मिळून शेतकऱ्यांनी 1142 मॅट्रिक टन कोश उत्पादन घेतले व यातून बीड जिल्ह्याला तब्बल 35 कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले. सध्या जर आपण रेशीम कोष चा प्रति किलोचा भाव पाहिला तर तो साडेपाचशे ते सहाशे रुपये आहे.

 रेशीम शेतीसाठी कसे आहे अनुदानाचे स्वरूप?

जर आपण रेशीम शेतीच्या बाबतीत असलेल्या योजनेचा विचार केला तर यामधील रेशीम विकास योजनेला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत अनुदान दिले जाते. यामध्ये तीन वर्षाकरिता एक एकर तुती लागवडीकरिता बागेचे व्यवस्थापन, रेशीम कीटक संगोपन व गृह उभारणी करिता तीन लाख 58 हजार 115 रुपये अनुदान देण्यात येते.

या अनुदानाचा लाभ आणि कमी पाण्यावर लागवड करून देखील शेतकरी 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न या माध्यमातून घेत आहे. या योजनेच्या माध्यमातून आता बीड जिल्ह्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याकरिता नवीन 1 हजार लाभार्थी शेतकऱ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे देखील संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

 2014-15 2022-23 पर्यंत बीड जिल्ह्यात झालेली रेशीम शेतीतील वाढ आणि उत्पादन

जर आपण बीड जिल्ह्यातील रेशीम उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पाहिली तर साधारणपणे 2014 ते 15 आणि 2022 ते 23 या 9 वर्षांमध्ये त्यात सातत्याने वाढ होत गेलेली आपल्याला दिसून येते. 2014 ते 15 मध्ये 458 शेतकऱ्यांनी तूतिची लागवड 67 हेक्टरमध्ये केली होती व 163.72 मॅट्रिक टन कोष उत्पादन घेतले होते. त्या तुलनेत सन 2022 ते 23 या कालावधीमध्ये तब्बल 3583 शेतकरी या उद्योगांमध्ये असून या सर्व मिळून शेतकऱ्यांनी 1142.163 मॅट्रिक टन रेशीम कोष उत्पादन घेतले.

यावरून आपल्याला दिसून येते की सातत्याने बीड जिल्ह्यामध्ये रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत असून त्या माध्यमातून रेशीम कोष उत्पादन देखील वाढतांना दिसून येत आहे. यामागे जर आपण विचार केला तर इतर पिकांच्या तुलनेमध्ये चार पट पाणी रेशीम शेतीसाठी कमी लागते. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रेशीम शेतीची कास धरल्याचे दिसून येते.