80 वर्षापुर्वीच्या हिंदू भाडेकरुने मशिदची जागा मशिदीला विनामोबदला स्वखुशीने केली परत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- भाडेकरु व जागा मालक यांची वादावादी सर्वश्रुत आहे. जागा मंदिरची असो किंवा मशिदची जुने भाडेकरुंना जागा खाली करण्यावरुन अनेकवेळा वाद होताना दिसतात.

मात्र शहरात 80 वर्षापुर्वीच्या आजोबांच्या काळात मशिदचे भाडेकरु असलेल्या एका हिंदू गुजराती व्यक्तीने ताब्यात असलेली मशिदची जागा मशिदीला विनामोबदला स्वखुशीने परत करुन एक सामजस्याचा संदेश दिला आहे. शहराच्या गांधी मैदान येथे फताह मस्जिद आहे.

या मशिदीच्या जागेत आजोबांच्या काळापासून भाडेकरु असलेले भरतकुमार नवनीतदास पारेख यांनी मशिदला जागेची आवश्यकता असताना भाडेपोटी वापरत असलेले सातशे स्के. फुटाची जागा विनामोबदला स्वखुशीने मशिद ट्रस्टला परत दिली. पारेख यांचा मशिदित ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी फताह मस्जिद ट्रस्टचे चेअरमन शफी रंगरेज, सचिव हाजी कासमभाई चुडीवाला, कायदे सल्लागार अ‍ॅड. फारुक बिलाल, विश्‍वस्त फारुक रंगरेज, शकुर शेख, गुलाम अहमद रंगरेज आदी उपस्थित होते. भरत पारेख यांचे आजोबा 80 वर्षापुर्वी मशिदीच्या जागेत असलेला व्यावसायिक गाळा 40 रुपये दरमहा भाड्याने घेतला होता.

या जागेत सध्या भरतकुमार पारेख प्लंबिंगचे साहित्य विकत होते. मशिदला जागेची आवश्यकता असताना व त्यांचे देखील इतर ठिकाणी मोठे दुकान होऊन परिस्थिती चांगली झाली असताना त्यांनी मशिदला स्वखुशीने सदर जागा कोणताही मोबदला न मागता परत दिली आहे. शहरात अनेक ठिकाणी मशिदच्या जागेत जुने भाडेकरु आहेत

जेंव्हा मशिदला जागेची गरज पडते, तेंव्हा जुने भाडेकरु स्वखुशीने जागा सहजासहजी परत करत नाही. भाडे कमी असल्याने इतर ठिकाणी जागा घेऊन देखील मशिदची जागा स्वत:च्या ताब्यात ठेवली जाते. यामुळे अनेकदा वादावादी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

मात्र पारेख यांनी मनाचा मोठेपणा दाखवत मशिदची जागा मशिदला देऊन एक आदर्श निर्माण केला असल्याची भावना ट्रस्टचे चेअरमन न शफी रंगरेज यांनी व्यक्त केली.