मोठी बातमी : विखेंच्या प्रश्नाला आदित्य ठाकरेंचे लेखी उत्तर, थोरातांच्या संस्थांसंबंधी हा निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Ahmednagar News :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी संबंधित संगमनेर नगरपरिषद आणि तालुका दूध संघातून प्रवरा नदीत सोडण्‍यात येणा-या प्रदूषित पाण्‍यासंदर्भात शिर्डीचे भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.

यातील लेखी प्रश्नाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर देत दोन्ही संस्थांवर झालेल्या कारवाईची माहिती दिली आहे. तर विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्‍यमंत्री संजय बनसोड यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे.

थोरात आणि विखे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा नेहमची प्रयत्न करीत असतात. संगमनेर तालुक्यात प्रवरा नदीत प्रदूषित पाणी सोडण्यात येते आणि त्याचा त्रास आमच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गावांना होतो, अशी विखे यांची तक्रार आहे.

संगमनेर नगरपालिका आणि संगमनेर तालुका दूध संघ या दोन्ही संस्थांकडून होत असलेल्या प्रदूषणासंबंधी काय कारवाई केली, असा प्रश्न विखे यांनी विचारला होता.

त्यावरील उत्तरात म्हटले आहे की, महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत संगमनेर नगर परिषदेला घरघुती सांडपाणी यंत्रणा उभारण्यासंबंधी ऑक्टोबर २०२१ मध्ये कळविले होते. हे प्रकरण लवादाकडेही गेले होते.

लवादाने पूर्वीच दिलेल्या आदेशानुसार संगमनेर नगरपरिषदेला पर्यावरण नुकसान भरपाई म्‍हणून ५ कोटी, ४० लाख रुपये भरण्याचे निर्देश २ मार्च २२ रोजी देण्यात आले आहेत.

संगमनेर तालुका दूध संघाच्‍या केंद्रातून पांढ-या रंगाच्‍या पाण्‍याचा विसर्ग कारखाना परिसराबाहेर चेंबर होत असल्‍याचे आढळून आले होते. त्यावरून त्या उद्योगाची २ लाख ५० हजार रुपयांची बॅक हमी महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जप्‍त केली असल्‍याचे या लेखी उत्‍तरात म्‍हटले आहे.

त्यानंतर आज विखेंनी मांडलेल्या याच विषयावरील लक्षवेधीवर चर्चा झाली. त्यानंतर या चर्चेला उत्‍तर देताना राज्‍यमंत्री संजय बनसोड यांनी यासंबंधी तातडीने बैठक घेण्‍याचे आश्‍वासन दिले.

प्रवरा नदीपात्रात प्रदूषित पाणी सोडणा-या सहकारी संस्‍था आणि स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्थांवर महाराष्‍ट्र प्रदूषण मंडळाच्‍या माध्‍यमातून कारवाई करण्‍याची ग्‍वाही त्यांनी दिली.