मंत्री बाळासाहेब थोरातांच्या तालुक्यात बैलगाडा शर्यत !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात बेकायदेशीर बैलगाडा शर्यत आयोजित केल्या प्रकरणी आयोजकांसह स्पर्धकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर, पुणे जिल्ह्यातील 47 जणांविरोधात संगमनेरच्या घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ६ जण व गाडीसह एक बैलजोडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. बंदी असतानादेखील संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे ही बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पठार भागात या शर्यतीचे आयोजन करण्यात आला होता. विशेष म्हणजे महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या तालुक्यातच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे. या थरारक शर्यतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

लोकांनी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यास राज्यात बंदी आहे. नियम धुडकाऊन बैलगाडा शर्यतीचे आयोजन केलेच तर त्यासाठी कठोर कारवाईची तरतूद आहे. असे असूनदेखील राज्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येते.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातसुद्धा अशाच प्रकारे बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला. तालुक्यातील पठार भागात ही शर्यत आयोजित करण्यात आली होती. बैलगाडा शर्यतीदरम्यान येथे लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच येथे लोकांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान उघडपणे बैलगाडी शर्यत होत असताना देखील घारगाव पोलीस प्रशासनाला याची कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती. साकुर पठार भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत आहे . या पार्श्वभूमीवर जिल्ह्याधिकारी राजेंद्र भोसले यांनी बैठकही घेतली होती.

त्यानंतर येथील सुमारे २० गावे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बंद केली होती. मात्र रविवारी स्वातंत्र्य दिनी प्रशासनाला चाहूल लागू न देता दरेवाडी येथे खुलेआम बैलगाडा शर्यती सुरू करण्यात आल्या होत्या.