आमदार लंके यांनी अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली कि खंडणीसाठीचं पत्र?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांना 1 कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली मात्र निलेश लंके यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्याला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता मनसेने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे.

अब्रुनुकसानीची १ कोटी रुपयांची नोटीस मिळाल्यानंतर मनसे पदाधिकारी अविनाश पाटील यांनी आपली बाजू सांगणारा व्हिडीओ शेअर केला. यात त्यांनी थेट आमदार निलेश लंके यांच्यावर फोन करुन त्यांना आणि पक्षाला शिवीगाळ केल्याचा आरोप केलाय.

तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनाच मदतीसाठी आवाहन केलंय. त्यामुळे आता अहमदनगरच्या या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या स्तरावर उमटण्याची शक्यता आहे. मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करत निलेश लंके यांनी इशारा दिला आहे.

अब्रुनुकसानीची नोटीस आहे,कि खंडणीसाठीचं पत्र, असा सवाल उपस्थित करत आपल्या या बेकायदेशीर नोटीसला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, असं अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे. तसेच निलेश लंके ही लढाई आपण सुरु केली, पण ही लढाई आम्हीच संपवणार हे निश्चित, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

दरम्यान आरोपांवर मनसेचे पारनेरचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार म्हणाले, “बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांच्यासह सर्व मनसे सैनिकांना माझी विनंती आहे की माझा हा व्हिडीओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवा.

साहेबांना सांगा की तुमचा मनसे सैनिक पूर्णपणे खचला आहे. आता सहन होत नाही. 11 मे रोजी माझ्यासोबत एक प्रसंग घडला. मी आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात असताना पारनेरचे लोकप्रतिनिधी निलेश लंके यांनी डॉ. गंधे यांच्या फोनवरुन फोन केला.

तेव्हा डॉ. गंधे यांनी मला आमदार लंकेंसोबत बोलण्यास सांगितले. तेव्हा लंके यांनी मला आणि मनसे पक्षाला आईवरुन शिवीगाळ केली. हे सर्व करुनही त्यांनी उलट मलाच खोटे अर्ज दाखल करुन अडकवण्याचा प्रयत्न केला.”

“पारनेरचे तहसिलदार नोटीस काढतात, पोलीस नोटीस देतात. त्यांच्याकडे चकरा मारत सहन करत असतानाच मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील मानसिक त्रास देण्यात आला. त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून धमक्या देण्यात आल्या.

आता मला वकिलांमार्फत नोटीस देत 15 दिवसात 1 कोटी 5 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आलीय. तसं नाही केलं तर माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे,” असंही अविनाश पवार यांनी नमूद केलं.