शेतकऱ्यांचा पुन्हा देशपातळीवर लढा, आता या प्रश्नावर होणार संघर्ष

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Farmers news :- शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले. त्यानंतर संयुक्त किसान मोर्चात फूट पडल्याचे सांगण्यात येत असले तरी डाव्या विचारांच्या शेतकरी संघटना पुन्हा केंद्र सरकारविरूद्ध लढण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

आता दुधाला उसाप्रमाणे उत्पादन खर्चावर आधारित रास्त भावाची (एफआरपी) हमी मिळावी या मागणीसाठी हा संघर्ष उभा करण्यात येणार आहे, अशी माहिती किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.

अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व सरचिटणीस हन्नन मोल्ला यांच्या सहकार्याने देशस्तरावरील सर्व प्रमुख दूध उत्पादक राज्यांच्या प्रतिनिधींची बैठक केरळमध्ये कन्नूर येथे नुकतीच झाली.

त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व दूध उत्पादक राज्यांमधील प्रमुख शेतकरी नेत्यांची दोन दिवसांची कार्यशाळा १४ व १५ मे रोजी केरळमध्ये घेण्यात येणार आहे.

या माध्यमातून देशस्तरावर दूध उत्पादकांची भक्कम संघटना उभी करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. उसाप्रमाणे दुधाला एफ.आर.पी. चे संरक्षण मिळावे व दूध आणि दुग्ध पदार्थांच्या निर्मितीमध्ये तयार होणाऱ्या नफ्यात शेतकरी कुटुंबांना रास्त वाटा मिळावा यासाठी दूध क्षेत्राला रेव्हेन्यू शेअरींगचे धोरण लागू करावे या प्रमुख मागण्या आहेत.

विविध संघटना, नेते, कार्यकर्ते व प्रगतिशील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती स्थापन करून आंदोलनाच्या माध्यमातून दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात गेले चार वर्ष सुरू आहे. आता अशाच प्रकारचे प्रयत्न देशस्तरावर सुरू झाले आहेत.