शासनास चुकीची माहिती देऊन फसवणूक करणार्‍या बँकेवर कारवाई करण्याची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने शासकीय, प्रशासकीय व न्याय व्यवस्थेवर दबाव टाकून मागासवर्गीय अनुकंपा धारकांना नोकरीपासून वंचित ठेवल्याचा आरोप करुन अनुकंपा धारकांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळण्याच्या मागणीसाठी दि.1 मे महाराष्ट्र दिनी राष्ट्रपती भवन समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता.

वाढत्या कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असून, शासनास चुकीची माहिती देऊन फसवणूक करणार्‍या बँकेवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू विचारमंचच्या वतीने करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने सन 2003 पासून अनुकंपा भरती बंद केल्याने अनुकंपा धारकांचा जीवन मरणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.बँकेच्या दीडशे अनुकंपा धारकांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी द्यावी किंवा नोकरी देण्याची मागणी केली आहे.

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व शासनावर वाढती जबाबदारी लक्षात घेऊन समाज हितासाठी हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

अहमदनगर जिल्हा बँके सदर प्रश्‍नी चुकीची माहिती देऊन शासनाची फसवणूक करत आहे आणि अनुकंपा धारकांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न चालवला आहे. 18 सप्टेंबर 2020 रोजी बँकेने ठराव करून अनुकंपा धारकांना तीन ते सात लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे निश्‍चित केले आहे, असे शासनास माहिती पत्राद्वारे देण्यात आली.

परंतु 10 मार्च 2021 च्या परिपत्रकानुसार पैसे घेऊन नोकरी अधिकार कायमचा सोडून द्यावा असे बजावले आहे. हा बेकायदा ठराव घेऊन अनुकंपा धारकांचे जीवन उध्वस्त करण्याचा डाव संचालकांनी आखला आहे. जिल्हा बँकेत 22 जानेवारी 2013 च्या सहकार आयुक्त पुणे यांच्या परिपत्रकानुसार अनुकंपा भरतीचे सर्व अधिकार बँकेच्या संचालक मंडळास मिळाले आहे.

20 ऑक्टोंबर 1995 च्या जिल्हा सहकारी बँकेने ठराव करून अनुकंपा भरती मंजुरी दिली आहे. तरीदेखील अनुकंपा नियुक्ती धोरण बँकेस लागू नसल्याची चुकीची माहिती देण्यात आली आहे. नॅशनल एक्स सर्विसमॅन एजन्सीला बेकायदा नोकर भरतीचा अधिकार देण्यात आला. सदर एजन्सीला लिपिक व शिपाई भरतीचे अधिकार दिले गेले.

परंतु या एजन्सीला सिक्युरिटी गार्ड पुरवठा करण्याचा परवाना आहे. त्याबाबत खुलासा न करता करार करण्यात आलेला आहे. ही एक प्रकारे फसवणूक असून, अनुकंपाधारक मागसवर्गीय असल्याने त्यांना जाणीवपुर्वक नोकरीपासून वंचित ठेवले जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

आर्थिक संकट व उपासमारीने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बिकट बनला असताना अनुकंपाधारक यांच्या कुटुंबात काहींनी आत्महत्या केल्यास याची जबाबदारी बँकेचे संचालक मंडळ व प्रशासनावर राहणारे आहे.

बँकेत नोकर भरती प्रकरणी भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करावी, संचालक मंडळास अनुकंपा धारकांना नोकरी देण्याचा ठराव घेण्याचा आदेश देण्याची मागणी अनुकंपा धारकांच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव व सचिव नितीनचंद्र भालेराव यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|