Maharashtra Politics : राज्यातील ठाकरे सरकार पडणार ? महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Maharashtra Politics  :- राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच महाराष्ट्रामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यात राजकीय सामना रंगलेला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवायांना वेग आला आहे पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पक्ष अधिकच आक्रमक झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तपास यंत्रणांना लक्ष्य करण्याच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रयत्नांवर चांगलीच खेचली. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून, नंतर तीनही राजकीय पक्षांत फूट पाडण्याची व्यूहनीती आखली असल्याचे सांगितले जाते.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते आ. आशिष शेलार यांनी राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यातील सद्यस्थितीबाबत यावेळी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. १२ आमदारांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीचा मुद्दा, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा विषय या चर्चेत होता, असे समजते.

चार मंत्रीही राज्यपालांना भेटले छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ आणि विजय वडेट्टीवार या चार मंत्र्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या विधेयकास मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच, विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी परवानगी मागितली. याविषयी आपण लवकरच राज्य सरकारला कळवू, असे राज्यपालांनी त्यांना सांगितले.

राष्ट्रपती राजवट, बिलकूल नाही भाजपच्या विजयानंतर आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यपालांशी भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना ही शक्यता फेटाळून लावली. १७० आमदारांचे भक्कम संख्याबळ आमच्याकडे असताना, राष्ट्रपती राजवटीचा प्रश्न येतोच कुठे, असा सवाल त्यांनी केला.

 एकनाथ शिंदे म्हणाले.. “राज्यात राष्ट्रपती राजवट कशासाठी लावणार? नेमकं कारण काय? आज महाविकास आघाडी सरकारकडे 170 चं बहुमत आहे. लोकशाहीमध्ये बहुमताच्या आकड्याला महत्त्व असतं. राष्ट्रपती राजवट कोणत्या आधारावर लावता येईल? महाविकास आघाडी सरकार बहुमताचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी, कष्टकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकार करत आहे.

किंबहुना राज्याने या कोरोना काळाचा सामना समर्थपणे केला आहे. आपल्या राज्याचं अनुकरण इतर राज्यांनीही केलं आहे. राज्याचं आज विधीमंडळात सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असं आहे. असं असताना आणि बहुमताचं सरकार असताना राष्ट्रपती राजवट लावण्याचं कारण काय?”, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.