राष्ट्रवादीचे दुहेरी धोरण, एकाने मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्याने माफी मागायची; मिटकरींच्या वक्तव्यावर विखे पाटलांचा आरोप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : राष्ट्रवादी (Ncp) काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी इस्लामपुरात (Islampur) केलेल्या वक्तव्यामुळे ब्राम्हण समाज अधिक आक्रमक झाला असून ब्राह्मण समाजाकडून विविध ठिकाणी राष्ट्रवादी व मिटकरी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

मिटकरी यांच्या विधानावर भाजपकडून (Bjp) तीव्र प्रतिक्रिया येत असून नुकतेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krishna Vikhe Patil) यांनीही अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

विखे पाटील यांनी बोलताना मिटकरी यांनी केलेल्या विधानाची माफी मागितली पाहिजे असे आवाहन केले आहे. ते म्हणाले, एखाद्या समाजाबाबत अशा प्रकारे वक्तव्य करणं योग्य नाही. राष्ट्रवादीची भूमिकाच बेताल वक्तव्य करण्याची, धर्मासंदर्भात मुक्ताफळं उधळण्याची, अंगावर बाजू आली की माफी मागायची, अशीच त्यांची भूमिका राहिली आहे.

सांगलीत झालेल्या कार्यक्रमात वक्तव्य केल्यामुळे जयंत पाटलांनी माफी मागितली. मिटकरींनी माफी मागितली पाहिजे. मिटकरींनी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाने त्यांनी कारणे दाखवा नोटीस काढायला हवी.

राष्ट्रवादीने बेताल वक्तव्य करण्यासाठी काही माणसंच तयार केली आहेत. एकाने मारल्यासारखं करायचं आणि एकाने माफी मागायची, असं दुहेरी धोरण राष्ट्रवादीचं आहे, अशा शब्दात विखे-पाटलांनी राष्ट्रवादी व मिटकरी यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, विखे पाटील यांनी बोलताना महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवरही हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, राज्यभर पोलखोल यात्रा निघतील. सरकारच्या भ्रष्टाचाराची लख्तरं दररोज टांगली जात आहेत.

भ्रष्टाचाराची पोलखोल होणार असल्यानंच शिवसेनेकडून (Shivsena) पोलखोल यात्रेवर हल्ला करण्यात आला आहे. मात्र हल्ले करुन मुस्कटदाबी होणार नाही. तोंड दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर तो तुमचा गैरसमज आहे. तुमची पळताभुई थोडी करुन सोडू, असा इशाराच विखे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.