तर पुन्हा कडक निर्बंध लागू करावे लागतील : डॉ.भोसले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत नसल्याने जिल्ह्याच्या काही तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा गतीने वाढताना दिसून येत आहे. काही ठिकाणी परवानगी दिलेल्या व्यतिरिक्त आस्थापना सुरु असल्याचे दिसत आहे.

अशा आस्थापना बंदची कारवाई करा. प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात तालुका यंत्रणांनी पावले उचलावी.  जिल्ह्यात सातत्याने रुग्णवाढ नोंदवली जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करत जिल्ह्याचा आरटीपीसीआर चाचण्यांचा बाधित दर मागील आठवड्यात जवळपास ८ टक्के इतका झाला आहे.

हा दर असाच वाढत राहिल्यास जिल्ह्यात पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद करावे लागतील, असे डॉ.भोसले म्हणाले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. यावेळी ते पुढे म्हणाले की,

गेल्या आठवड्यात पाथर्डी, शेवगाव, संगमनेर, पारनेर, राहुरी, नेवासा आदी तालुक्यात मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांच्यासह भेटी दिल्या. त्यावेळीही परवानगी दिलेल्या वेळेव्यतिरिक्त आस्थापना सुरु असल्याचे चित्र दिसून आले. कोरोना संसर्ग वाढण्यास असे प्रकार कारणीभूत ठरत आहेत.

महानगरपालिका क्षेत्रातही सायंकाळीही आस्थापना सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. संबंधित यंत्रणांनी प्रतिबंधात्मक कारवाई गतिमान करावी, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी दिल्या. लग्न समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन केले जात असल्याच्या नागरिकांकडून तक्रारी येत आहेत.

तालुका यंत्रणांनी अशा तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कारवाई करणे अपेक्षित आहे. याशिवाय गाव, तालुका, नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, अशा सूचना त्यांनी दिल्या.