शेतकऱ्यांना पीककर्जाची प्रतीक्षा : वाढीव कर्जाचीही मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : सन २०२३-२४ खरीप हंगाम पीक कर्जाचा भरणा ३१ मार्चपूर्वी करावयाचा होता, त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कर्जभरणा केला. व्याज माफीसाठी ३१ मार्च पूर्वी भरणा करण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले.

त्यासाठी हातउसणेही घेण्यात आले. त्या पैशाची परतफेड करता यावी म्हणून आता शेतकऱ्यांना नवीन हंगामातील पीक कर्जची प्रतीक्षा लागली असून, वाढीव कर्जाची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व नियोजनाची तयारी सध्या सुरु आहे. थकीत कर्जाचा भरणा करून कर्ज मिळावे, यासाठी नेहमीप्रमाणे असंख्य शेतकऱ्यांनी आपल्याकडील थकीत कर्जाचा भरणा केला.

त्यासाठी अनेकांना मोठी कसरत करावी लागली. कर्जाचा भरणा करण्यासाठी जुळवाजुळव म्हणून काहींनी व्याजाने तर काहींनी हातउसणे पैसे घेऊन कर्ज भरले.

थकीत कर्ज भरल्याने आता सन २०२४-२५ खरीप हंगाम पीक कर्जासाठी शेतकरी पात्र झाले असल्याने लवकरात लवकर कर्ज मिळावे, यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे खरीप पीक कर्जाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीची किंमत अंदाजे २० लाख रुपये असेल तर त्यांना पीककर्ज एक लाख रुपये मिळते. एक लाख रुपयात शेतीसाठीचा खर्च भागवणे अवघड झाले आहे, कारण बियाणे, खते व औषधांच्या वाढत्या किंमतीमुळे परिसरातील शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली असल्याने ते हवालदिल झाले आहेत.

यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या मालाचे खूप नुकसान झाले, त्यामुळे शासनाने कर्जमाफी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.