Land Rule: ‘अशा पद्धती’ने करता येते भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर! किती भरावा लागतो नजराणा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land Rule:- जमिनीच्या बाबतीत पाहिले तर शासनाचे अनेक प्रकारचे नियम आहेत. तसेच जमिनीचा धारणा प्रकार देखील वेगवेगळ्या आहे. यामध्ये भोगवटादार वर्ग दोन आणि आणि वर्ग एक असे जमिनीचे प्रमुख प्रकार येतात. या प्रकारच्या जमिनीमध्ये तुम्हाला भोगवटादार वर्ग 2 असलेल्या जमिनीचे वर्ग एक मध्ये रूपांतर करता येते.

परंतु त्यासाठीची एक आवश्यक प्रक्रिया असते व ती पूर्ण करणे गरजेचे असते. जर आपण गेल्या काही वर्षाचा विचार केला तर नेमका या रूपांतर प्रक्रियेमध्ये बरेच बदल करण्यात आलेले आहेत. ते संबंधित शेतकऱ्यांना माहीत असणे गरजेचे असते. त्या अनुषंगाने आपण या लेखात याबद्दलची माहिती घेऊ.

 भोगवटादार वर्ग 1 जमीन म्हणजे काय?

भोगवटादार वर्ग 1 पद्धतीमध्ये अशा जमिनीचा समावेश होतो की त्या जमिनीच्या हस्तांतरण करण्यावर शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे नियम किंवा निर्बंध नसतात. म्हणजेच दुसऱ्या शब्दात  सांगायचे म्हटले म्हणजे शेतकरी अशा जमिनीचे मालक असतात.

 भोगवटादार वर्ग 2 जमीन म्हणजे काय?

या पद्धतीमध्ये अशा जमिनीचा समावेश होतो की त्या जमिनी खातेदारांना शासनाच्या माध्यमातुन मिळालेल्या असतात. या प्रकारच्या जमिनीच्या हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेवर शासनाचे काही निर्बंध आहेत.

म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय या जमिनीचे हस्तांतरण शक्य होत नाही. अशा प्रकारच्या जमिनीमध्ये प्रामुख्याने भूमिहीन शेतकऱ्यांना ज्या काही शासनाच्या माध्यमातून वाटप केलेले जमिनी असतात त्या व देवस्थान इनाम जमिनीचा समावेश होतो.

 भोगवटादार वर्ग 2 जमिनीचे 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी असा करावा अर्ज

भोगवटादार वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग एक मध्ये रूपांतर करण्यासाठीचा नियम आठ मार्च 2019 रोजी राजपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आला. या नियमाच्या माध्यमातून पाहिले तर शासनाच्या माध्यमातून नागरिकांना कृषक, रहिवासी,

वाणिज्य किंवा औद्योगिक वापरासाठी कब्जा हक्काने अथवा भाडेपट्टाने प्रदान केले आहेत, त्या जमिनीचे वर्ग एक मध्ये रूपांतर करता येते. याकरिता संबंधितांना तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांकडे अर्ज करणे गरजेचे असते. त्याकरिता….

सुरुवातीला जमीन धारकाचे नाव तसेच संपूर्ण पत्ता, जमीन धारकाचा संपर्क क्रमांक, जमीन धारकाला जमीन देण्यात आली त्या आदेशाचा क्रमांक व दिनांक व संबंधित जमीन जमीन धारकाला कब्जेहक्काने प्रदान करण्यात आले आहे की भाडेपट्ट्याने इत्यादी जमिनी बाबत तपशील नमूद करून मग पुढे अर्ज लिहायचा असतो. यामध्ये…

1- सुरुवातीला गावाचे, तालुका व जिल्ह्याचे नाव लिहा.

2- नंतर अनुक्रमांक व कोणत्या गटातील जमीन आहे तो गट किंवा भूमापन क्रमांक लिहिल्यानंतर त्याखाली जमिनीचे क्षेत्र एकर आर मध्ये लिहायचे असते. जमिनी वेगवेगळ्या गटात असेल तर ते एकाखाली एक नंबर टाकून लिहायचे असते.

3- त्यानंतर उपरोक्त जमीन, महाराष्ट्र जमीन महसूल( भोगवटादार वर्ग दोन आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग एक मध्ये रूपांतरित करणे) नियम 2019 अन्वये भोगवटादार वर्ग एक मध्ये रूपांतरित करणे कामी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करीत आहे. सदर जमिनीचे नियमानुसार होणारे अधिमूल्य शासनास अदा करण्यास मी तयार असून कृपया माझी उपरोक्त जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करून मिळावी.

वरील माहिती माझ्या माहितीप्रमाणे खरी व बरोबर आहे.

पुढे अर्जदाराची सही करावी व ठिकाण आणि दिनांक म्हणजेच तारीख टाकावी.

अशा पद्धतीने साधारणपणे या अर्जाचे स्वरूप असते.

 याकरिता किती नजराणा लागतो?

याबाबत काही नियम बदललेले आहेत. जर या बदललेल्या नियमानुसार पाहिले तर खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये रूपांतर करताना कोणताही नजराणा आकारला जाणार नाही.

परंतु इतर जे काही भूमिहीन आहेत त्यांना सरकारने दिलेल्या जमिनींचे वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये रूपांतरण करण्यासाठी जे काही प्रचलित दर आहे त्यानुसार नजराणा आकारला जाईल असे देखील सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रचलित दरानुसार पाहिले तर…

1- कृषी प्रयोजनासाठी जमीन दिलेली असेल तर जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावाच्या 50 टक्के रक्कम शासनाकडे नजराना म्हणून जमा करणे गरजेचे असते.

2- जमीन जर वाणिज्यिक अथवा औद्योगिक वापराकरिता कब्जा हक्कान किंवा भाडेपट्ट्याने धारण केलेले असेल तर चालू वर्षाच्या बाजार भावाच्या 50% इतकी रक्कम ही नजराणा म्हणून जमा करणे गरजेचे असते.

3- रहिवासी वापराकरिता कब्जा हक्काने जमीन धारण केलेली असेल तर अशा जमिनीचे चालू वर्षाच्या बाजारभावाचे 15% इतके रक्कम नजराना म्हणून शासनाकडे भरावी लागते.

4- रहिवासी वापराकरिता पण भाडेपट्ट्याने जमीन धारण केलेली असेल तर जमिनीच्या चालू वर्षाच्या बाजारभावानुसार 25% इतकी रक्कम नजराणा म्हणून शासनाकडे जमा करावी लागते.

 यामध्ये महत्त्वाची गोष्ट

2019 च्या या नियमानुसार ज्या नागरिकांनी वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित केले आहे त्यांना नजरांना भरण्याकरिता मार्च 2022 पर्यंत मुदत होती. परंतु त्यासाठी आता सात मार्च 2024 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

 या प्रक्रिया करता कुठली कागदपत्रे लागतात?

यामध्ये संबंधित जमिनीचे केल्या 50 वर्षातील सातबारा उतारे, या सातबारा उताऱ्यावरील सर्व फेरफाराच्या नोंदी, चतु:सीमा दाखवणारा नकाशा, आकरबंदाची मूळ प्रत, एकत्रीकरणाचा मूळ उतारा, मूळ जमीन धारकास जमीन कशा पद्धतीने मिळाले आहे त्याबाबतचा कबूलायत आणि तलाठी कडील वन जमीन नोंदवहीचा उतारा इत्यादी कागदपत्रे लागतात.

 अर्ज केल्यानंतरची पुढील प्रक्रिया कशी असते?

अर्ज दाखल केल्यानंतर किती नजराणा भरायचा त्याबाबतचे चलन तहसील कार्यालयाकडून अर्जदारास दिले जाते व संबंधित अर्जदाराने ती रक्कम बँकेत भरल्यास चलन आणि खरेदीची इतर कागदपत्रे पाहून तलाठी त्या व्यवहाराची गाव नमुना 6 मध्ये नोंद करतात. त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व कागदपत्रे तपासले जातात. अशा पद्धतीने त्या जमिनीवरील भोगवटादार वर्ग 2 हा शेरा कमी होतो व त्या ठिकाणी भोगवटादार वर्ग 1 हा शेरा लागतो.

अशा पद्धतीने भोगवटादार वर्ग 2 जमिनीचे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करता येते.