जुलमी, हुकूमशाही राजवट ‘मशाल’ नष्ट करेल : उद्धव ठाकरे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : शिवसेनेचे (ठाकरे) मशाल चिन्ह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. आता मतदारांजवळ मशाल चिन्ह घेऊन जा. चिन्हातील फरक समजावून सांगा. हे केवळ चिन्ह नसून जुलमी आणि हुकूमशाही राजवट खाक करणारी ही मशाल आहे,

असा सूचक इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महाराष्ट्रात ४८ जागा जिंकेल, असा दावाही त्यांनी केला आहे.

शिवसेना भवन येथे मंगळवारी शिवसेने (ठाकरे) च्या ‘मशाल’ या अधिकृत चिन्हाच्या नव्या गीताचे अनावरण करण्यात आले. शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत, दिवाकर रावते, राजन विचारे, विनोद घोसाळकर आदी सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (ठाकरे) नवे गीत प्रसारित करून शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारण्याचा प्रयत्न केला आहे. ठाकरेंनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. मशाल चिन्हावर अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने (ठाकरे) विजय मिळवला आहे. आताही मशालीच्या तेजाने जुलमी आणि भ्रष्ट राजवट जळून खाक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा होतील. लवकरच जाहीरनामा किंवा वचननामा आणू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम लीगबाबत केलेल्या विधानावरून ठाकरेंनी पंतप्रधानांना फैलावर घेतले. पंतप्रधान काहीही म्हणाले, तरी जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जीनी मुस्लिम लीगशी युती केली होती. तसेच स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेस सहभागी झालेला पक्ष होता, हे मोदींना माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या असतील, अशा शब्दांत हल्ला चढवला.

रोख्यांमुळे मोदींचे बिंग फुटले

देशात चंदा दो धंदा लो, अशा प्रकारचा कारभार चालला होता. सर्वोच्च न्यायालयात या निवडणूक रोख्यांमुळे बिंग फुटले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला यांनी सुद्धा यावरून भाजपला घरचा अहेर दिल्याची आठवण ठाकरेंनी करून दिली. दहा वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी केलेल्या कामांचा पाढा वाचावा लागेल. मात्र, कितीही काही केले तरी याचे उत्तर निवडणुकीनंतर बदललेल्या चित्रातून भाजपला नक्की मिळेल.

महाराष्ट्रात ४८ जागा जिंकणार

लोकसभेची ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी आहे. महाविकास आघाडी मजबुतीने मैदानात उतरली असून महाराष्ट्रात ४८ जागा जिंकू, असा ठाकरे यांचा दावा आहे. भाजपने ४५ प्लसचा दिलेला आकडा संपूर्ण देशातला असल्याचा टोला त्यांनी लगावला. भाजप म्हणजे धूळ गोळा करणारा व्हॅक्युम क्लीनर असून भ्रष्टाचारी गोळा करत फिरत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.