Pik Vima : १ रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना लाभदायक !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima : अवेळी पडणारा पाऊस, नापिकी या गोष्टींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होते, त्यातूनच शेतकरी आत्महत्येचे प्रकार घडत असल्याचे निरीक्षण अनेक वेळा नोंदले गेले. त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अवघ्या १ रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

या योजनेला राज्यभरातील शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. बुधवार, २ ऑगस्टपर्यंत राज्यातील १ कोटी ५८ लाख ९२ हजार ६१७ शेतकऱ्यांनी १ रुपया भरून पीक विमा काढला आहे. त्या बदल्यात शेतकऱ्यांच्या पिकांना ५० हजार ९७२ कोटी ३१ लाख रुपयांचे संरक्षण मिळाले आहे.

१ जुलैला सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत १ कोटी ५८ लाख ९२ हजार ६१७ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे १६४.४८ टक्के इतके आहे. सर्वाधिक ४० लाख २९ हजार ९८५ शेतकरी लातूर विभागातील असून,

सर्वात कमी २ लाख १७ हजार ५३६ शेतकरी कोकण विभागातील आहेत. कमी जमीन धारणा क्षेत्र, आपत्कालीन परिस्थितीत विमा लाभ मिळण्याचे कमी प्रमाण या कारणांमुळे पूर्व विदर्भ व कोकणातील भात उत्पादक शेतकरी या योजनेत सहभागी होण्याचे प्रमाण कमी आहे.

पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या १ कोटी ४ लाख ९७ हजार ७२८ हेक्टरवरील पिकांना विमा संरक्षण मिळाले असून, ५० हजार ९७२ कोटींचा विमा उतरवण्यात आला आहे.

त्यातील राज्याचा हिस्सा ४ हजार ४९४ कोटी २६ लाख रुपये असून, केंद्र सरकार आपल्या हिश्श्यापोटी ३ हजार ६० कोटी रुपये देणार आहे. तर एकूण विमा हप्ता हा ७ हजार ५५६ कोटींचा झाला आहे.