Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे दरवाजे ह्या तारखेपर्यंत बंदच राहणार ! धरणात आहे इतके पाणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jayakwadi Dam : मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाचे दरवाजे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी सोमवारी जारी केले आहेत. धरणात फक्त २६ टक्के जलसाठा आहे.

नाशिक जिल्ह्यातील लाभक्षेत्रातून जायकवाडी धरणाकडे येणारी पाण्याची आवक नगण्य आहे. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्याचा विचार करून धरणातून पाणी सोडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली. जून महिन्यांत समाधानकारक पाऊस झाला नाही.

जुलै महिन्यात आजवर झालेल्या पावसामुळे जायकवाडीत फारशी आवक आलेली नाही. नाशिक जिल्ह्यातून पाण्याची अतिशय कमी आवक आहे. त्यामुळे नियमित लागणाऱ्या पाण्याचे नियोजन व पुढील उन्हाळ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज धरणातील उपलब्ध जलसाठ्यातून पूर्ण व्हावी,

यासाठी जायकवाडीचे सर्व दरवाजे बंद करण्याचे आदेश निघाले. ऑक्टोबर २०२३ पर्यंत धरणात ३३ टक्के जलसाठा आल्यावर पुढील निर्णय होईल. ५२ ते ५५ एमएलडी पाण्याची गरज उद्योगांना आहे. एमआयडीसीच्या योजनांतून हा उपसा होऊन उद्योगांना पाणी पुरविले जाते.

शहराची पाण्याची गरज २६० एमएलडी असून सध्या १३५ एमएलडीचा पाणीपुरवठा होतो. धरणात मनपाची पाणी उपसा यंत्रणा आहे. एप्रिल २०१६ मध्ये जिल्हा प्रशासनाने उद्योगांच्या पाणी कपातीचा निर्णय घेतला होता.

परंतु त्यानंतरच्या पावसाळ्यांमध्ये धरणात पाण्याची आवक चांगली राहिली.मागील चार वर्षांपासून धरणाचे दरवाजे उघडावे लागत आहेत. यंदा मात्र पावसाने दडी मारल्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी आहे. जायकवाडीत धरणातून अंदाजे लहान- मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत.

शिवाय दोन ते अडीच लाख शेतकरीदेखील अवलंबून आहेत. औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतील गावे, औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित आहे. शहराला रोज १३५ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. तर उद्योगांना ५२ एमएलडी पाणी उपसा होतो. म्हणजेच शहराला रोज २ द.ल.घ.मी पाणी लागते. मृत जलसाठ्यातून साधारणतः दीड वर्ष पाणीपुरवठा होणे शक्य आहे. जायकवाडीच्या मृत जलसाठ्याची क्षमता ७३८.१०६ द.ल.घ.मी. आहे.