दोनदा महापौर, सात वर्षे आमदार, दहा वर्षे वडील आमदार, पाच वर्ष नगराध्यक्ष असणाऱ्यांना शहरात एक हॉस्पिटल उभारता आले नाही !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :- शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहराच्या विद्यमान राष्ट्रवादीच्या आमदारांचे नाव न घेता सत्ताधाऱ्यांनी नगर शहरामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी महानगरपालिकेचे इतक्या वर्षात साधे एकही हॉस्पिटल उभे केले नसल्याबद्दल भाष्य केले होते. 

त्याचे राजकीय पडसाद शहरात उमटू लागले आहेत. काळे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षांनी पत्रक काढत टीका केली होती. यावर आता काँग्रेसच्यावतीने पलटवार करण्यात आला असून ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी राष्ट्रवादीला अनेक सवाल यानिमित्ताने केले आहे. 

याबाबत देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात मनोज गुंदेचा यांनी म्हटले आहे की, विद्यमान आमदार हे दोन वेळा आमदार असून सात वर्ष ते या पदावर आहेत. त्यांना नगरकरांनी दोन वेळा महापौर होण्याची संधी दिली. जवळपास तीन-साडेतीन वर्षे ते या पदावर विराजमान होते. 

त्यांचे वडील दोन वेळा विधानपरिषदेचे आमदार असून जवळपास दहा वर्षांपेक्षा जास्त काळ ते या पदावर सत्तेत आहेत. एवढेच नाही तर आमदारांचे वडील हे मागील काळात पाच वर्षे अहमदनगर नगरपालिकेचे नगराध्यक्ष देखील राहिलेले आहेत. आमदारांच्या पत्नी या दोन वेळा नगरसेविका असून जवळपास सात वर्ष त्या या पदावर काम करीत आहेत. 

नगरकरांनी गेली अनेक वर्ष या कुटुंबाला सत्तेचा राहण्याची अनेक वेळा, अनेक वर्ष संधी दिलेली असताना देखील नगरसाठी साधे रस्ते न करू शकणाऱ्या आमदारांच्या बगलबच्च्यांनी आमदारांचे कौतुक नगरच्या जनतेला सांगू नये. 

इतक्या वर्षांच्या संधी नंतर सुद्धा या कुटुंबाला नगर शहरासाठी महानगरपालिकेचे अद्यावत असे साधे एक रुग्णालय उभारता येऊ नये ही नगर शहरातील नागरिकांसाठी शोकांतिकेची बाब आहे. 

आज कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये जर अशा प्रकारचे रुग्णालय मनपाच्या वतीने उभे केलेले असते तर शहरातील सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांना जिल्हा शासकीय रुग्णालया प्रमाणे मोफत आरोग्य सेवा या ठिकाणी मिळू शकली असती. 

या कुटुंबाला शहराच्या विकासाची दृष्टी असण्याची अपेक्षा नगरकरांनी ठेवणे हेच मुळात चुकीचे आहे. कोरोना संकट काळात शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे हे मागील एक वर्षापासून नगरकरांसाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अहोरात्र काम करीत आहेत. आमदारां प्रमाणे केवळ फोटोसेशन करीत चमकोगिरी न करता प्रत्यक्ष मैदानात उतरत कोरोनाशी दोन हात करण्याचे काम किरण काळे यांनी केले आहे. 

हजारो लोकांना अन्नधान्याचे वाटप, रक्तदान शिबिरांचे आयोजन, कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेड, वाढीव बिलांच्या संदर्भामध्ये नागरिकांना हॉस्पिटल प्रशासनाला जाब विचारत दिलासा देणे, काँग्रेस पक्षाच्या वतीने कोविड सहाय्यता आणि मदत केंद्राच्या माध्यमातून २४ तास सेवा देणारी हेल्पलाईन चालविणे, कोरोना काळात गरजूंना मोफत जेवण उपलब्ध करून देणे, 

परप्रांतीय बाधवांना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी मदत करणे, शहरातील ऑक्सीजन तुटवडा लक्षात घेता महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून शहराला ऑक्सिजनचे टँकर उपलब्ध करून देणे, 

ऑक्सीजन तुटवडा निर्माण झाला असताना शहरातील रुग्णालयांना ऑक्सीजन उपलब्ध करून देत कोरोना रुग्णांचे संभाव्य मृत्यू टाळण्यासाठी धावून जाणे, अशी अनेक कामे किरण काळे यांनी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत शहरातील नागरिकांसाठी केली आहेत. 

त्याचबरोबर महानगरपालिकेचे सुसज्ज रुग्णालय शहरात अस्तित्वात नसल्यामुळे नगर शहरातील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेसाठी १००० बेडचे जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटर उभारण्याबाबत किरण काळे यांनी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आलेल्या जिल्हा प्रशासनाच्या कोरोना आढावा बैठकीमध्ये संकल्पना व प्रस्ताव मांडत त्यासाठी महानगरपालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. 

अशी शेकडो कामे नगर शहरातील नागरिकांसाठी करणाऱ्या किरण काळे यांनी आमदारांच्या नाकर्तेपणा बाबत शहरातील नागरिकांसमोर वस्तुस्थिती मांडली तर ती राष्ट्रवादीवाल्यांना झोंबण्याचे काय कारण, असा सवाल मनोज गुंदेचा यांनी उपस्थित केला आहे. 

आमदारांच्या नाकर्तेपणाचा पुरावा म्हणून नगरकरांना रोज खड्ड्यातून जावे लागते एवढे एकमेव उदाहरण पुरेसे आहे. नगर शहराच्या या दयनीय अवस्थेला आमदारच जबाबदार आहेत. कारण आमदारकीसह महानगरपालिकेतील भाजप-राष्ट्रवादीच्या अभद्र युतीचे नेतृत्व देखील आमदार हेच करतात, असे गुंदेचा यांनी म्हटले आहे. 

परंतु ही वेळ राजकारण करण्याची नसून शहरातील नागरिकांना कोरोना संकटामध्ये मदत करण्याची आहे. काँग्रेस पक्ष आपली भूमिका चोखपणे बजावत आहे. तर राष्ट्रवादीने देखील यामध्ये राजकारण न करता नागरिकांना मदत करण्याची भूमिका ठेवली असती तर नगरकरांना बरे वाटले असते.

मात्र नगरकरांची सेवा करण्यात त्यांना रस नसल्यामुळे केवळ किरण काळे यांच्यावर सतत आरोप करणे यातच त्यांना धन्यता वाटते, हे दुर्दैवी असल्याचे मत मनोज गुंदेचा यांनी व्यक्त केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|