Ahmednagar News : नगर अर्बन घोटाळा : व्यवसायाकरिता घेतलेल्या ३ कोटी कर्जातून जागेची खरेदी, आरोपीची ‘ती’ रक्कम मोतीयानीच्या खात्यात वर्ग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या तत्कालीन सहाय्यक मुख्य व्यवस्थापक मनोज वसंतलाल फिरोदिया व प्रवीण सुरेश लहारे या दोघांनाही न्यायालयाने १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

फिरोदिया याने कुवत नसतानाही तारण मालमत्तांचे वाढीव दराचे मूल्यांकन अहवाल घेऊन त्यांना कमाल मर्यादेचे कर्ज मंजूर करण्याची शिफारस केली. तसेच, लहारे याने ३ कोटींचे कर्ज घेऊन ती रक्कम संशयित आरोपी मनोज वासुमल मोतीयानी याच्या खात्यात वर्ग केल्याचे व त्यातून जागा खरेदी झाल्याचा दावा आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात केला आहे.

अर्बन बँक घोटाळा कर्ज घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी (दि. २०) सायंकाळी फिरोदिया व लहारे या दोघांना अटक केली. त्यांना काल, बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली.

संशयित आरोपी फिरोदिया याने संचालक मंडळ, अधिकारी, कर्जदार व इतर आरोपीशी संगनमत करून गुन्हा केलेला आहे. यात २९१ कोटींचा अपहार झाला आहे. फिरोदिया कर्ज अर्ज छाननी विभागात सहायक प्रमुख व्यवस्थापक या जबाबदार पदावर काम करत असताना त्याने कर्जदारांची कुवत नसताना, कर्जाकरीता तारण मालमत्तांचे वाढीव दराचे मूल्यांकन अहवाल घेऊन त्यांना कर्ज मंजूर करण्याची शिफारस केलेली आहे.

अपहार कालावधीत फिरोदिया याच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात रोख रकमा जमा करण्यात आल्या आहेत. याबाबत त्याच्याकडे तपास करायचा आहे. तसेच, संशयित आरोपी लहारे याने त्याच्या नावे बँकेत व्यवसायाकरीता ३ कोटी रूपये कर्ज घेतले. ही पूर्ण कर्ज रक्कम गुन्ह्यातील निष्पन्न संशयित आरोपी मनोज वासुमल मोतीयानी याच्या बँक खात्यात वर्ग केली.

या कर्ज रकमेतून मोतीयानी याने खरेदी केलेली मालमत्ता ही या कर्जास तारण ठेवल्याचे समोर आले आहे. तसेच कोणतीही मालमत्ता तारण न घेता कर्ज मंजूर केले व मोतीयानी याने खरेदी केलेली मालमत्ता ही नंतर या कर्जास तारण ठेवण्यात आली. याच्या तपासासाठी १० दिवस पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद अॅड. दिवाणे व तपासी अधिकाऱ्यांनी केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.