…तर हे सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही; राऊत पुन्हा शिंदे सरकारवर बरसले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार, मोदी सरकारसह राज्यपालांवरही टीका केली आहे. महाराष्ट्रात घटनाबाह्य गोष्टी घडत असताना राज्यपाल कुठे आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडी सरकारनं 5 महत्त्वाचे निर्णय घेतले होते, त्यांना स्थगिती दिली किंवा रद्द असं काल मला समजलं. काही वेळापूर्वीच माझी उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. त्या निर्णयांमध्ये ठाकरे सरकारनं औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशीव केलं, त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दीबा पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. हे तिनही निर्णय फिरवले हे खरं असेल तर हे सरकार हिंदुत्वद्रोही आहे, महाराष्ट्रद्रोही आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी केंद्राची पर्वा न करता, इतर कोणाचीही पर्वा न करता, हिमतीनं एका हिंदुत्त्ववादी भूमिकेतून, लोकभावनेचा आदर म्हणून औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दीबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला होता. आणि जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारनं या निर्णयांना स्थगिती दिली असेल, तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत. हे सरकार बेकायदेशीर आहे, हे सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारला हे निर्णय फिरवण्याचा अजिबात अधिकार नाही. कारण या सरकारबाबतचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात व्यायचाय. एवढंच मी सांगतोय, असं संजय राऊत म्हणाले.