काँग्रेसच्या लुटीचा परवाना आम्ही रद्द केलाय – मोदी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Politics News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवला. काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार हीच देशाची ओळख बनली होती; परंतु आपल्या सरकारने काँग्रेसच्या लुटीचा परवाना रद्द करण्याचे काम केल्याचा दावा मोदींनी केला.

तसेच स्वातंत्र्यानंतर अनेक दशकांपर्यंत काँग्रेसने गरिबांच्या गरजांकडे कानाडोळा केला आणि त्यांचे दुःख कधीही जाणून घेतले नाही, असा आरोपही मोदींनी केला.

छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील अमाबाल गावात ‘विजय संकल्प शंखनाद’ रॅलीला संबोधित करताना मोदींनी काँग्रेसवर चौफेर टीका केली. काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार हीच देशाची ओळख बनली होती. भ्रष्टाचाराची सर्वाधिक झळ गरिबांना सोसावी लागत होती.

भ्रष्टाचारामुळे गरिबांचे हक्क हिरावून घेतले जात होते. २०१४ सालापूर्वी लाखो-करोडो रुपयांचे घोटाळे होत होते. काँग्रेस सरकारमध्ये दिल्लीतून एक रुपया पाठवला जात होता तर गावात फक्त १५ पैसे पोहोचत होते. हे मी नाही तर काँग्रेसचे माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणत होते.

तर मग ८५ पैशांवर कोण डल्ला मारायचे याचे उत्तर द्या, असे मोदी म्हणाले. काँग्रेसची ही लुटीची व्यवस्था बंद करण्याचे काम आपल्या सरकारने केले. गत १० वर्षांत ३४ लाख कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात आले. दिल्लीहून एक रुपया पाठवण्यात आला आणि पूर्ण १०० पैसे गरिबांच्या खात्यावर जमा झाले.

एक रुपया पाठवल्यावर ८५ पैसे गायब होण्याचा जादूचा खेळ आता बंद झाल्याचे मोदी म्हणाले. जर देशात काँग्रेसचे सरकार असते तर गरिबांच्या ३४ लाख कोटी रुपयांमधून २८ लाख कोटी रुपये लुटले गेले असते, अशी घणाघाती टीका त्यांनी या वेळी केली. तसेच आपल्याला दिल्या जात असलेल्या शिव्यावरून देखील त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.

मला कितीही धमक्या द्या. पण भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकले जाईल ही मोदीची गॅरंटी असल्याचे ते म्हणाले. आदिवासी समुदायाचा काँग्रेसने नेहमी द्वेष केल्याचा आरोप लावत मोदींनी आपल्या सरकारने गत १० वर्षांत आदिवासींसाठी केलेल्या कामांचा उल्लेख केला.

आज आदिवासी समाजातील मुलगी देशाच्या राष्ट्रपती असल्याचे नमूद करत भाजपने छत्तीसगडला पहिला आदिवासी मुख्यमंत्री दिल्याचे पंतप्रधान म्हणाले. गरिबांचे कल्याण हीच आपल्या सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.

त्याचबरोबर राम मंदिराचा उल्लेख करत आता रामनवमी जास्त दूर नसल्याचे त्यांनी म्हटले. या वेळी अयोध्येत रामलल्ला तंबूत नाही तर भव्य मंदिरात दर्शन देतील आणि हे स्वप्न ५०० वर्षानंतर पूर्ण होत असल्याचे मोदी म्हणाले.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याचा आरोप लावत काँग्रेसला आजही देशातील लोकांच्या गरजांशी काहीही देणे-घेणे नसल्याची टीका त्यांनी केली.