अहमदनगरच्या शेतकरी पुत्राने कांद्याच्या प्रश्नासंदर्भात थेट राष्ट्रपतींना घातलं साकडं ! पत्र लिहून केली ‘ही’ मागणी, भावनिक पत्राने अख्खा महाराष्ट्र गार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : सध्या महाराष्ट्रात कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणला आहे. कवडीमोल दरात कांदा विकला जात असल्याने उत्पादन खर्च देखील भरून निघत नाहीये. उत्पादन खर्च तर सोडाच पण वाहतुकीसाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना पदरमोड करून भागवावा लागत आहे. यामुळे कांद्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा वांदा केला असून जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर कांदा उत्पादकांना कर्जबाजारी व्हावे लागणार आहे.

कांदा सोबतच इतर शेतमालाला देखील अपेक्षित असा भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सोलापूर मधील एका शेतकऱ्याने 518 किलो कांदा विक्री केल्यानंतर त्याला मात्र दोन रुपयाचा धनादेश संबंधित व्यापाऱ्याकडून देण्यात आला आहे. एकंदरीत रद्दीपेक्षा कमी दरात कांदा विकला जात आहे.

संपूर्ण जगात कांद्याचा शॉर्टेज असून कांद्याचे दर आकाशाला गवसणी घेत असतानाच महाराष्ट्रासह भारतात मात्र कांद्याला कवडीमोल दर मिळत आहे. विशेष बाब म्हणजे एक ते दोन रुपये प्रति किलो दराने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून व्यापारी वर्ग चढ्यादरात कांदा विक्री करत आहेत. हेच कारण आहे की सर्वसामान्य ग्राहकांना कांदा 20 रुपये प्रति किलो या दरात उपलब्ध होत आहे. यामुळे व्यापाऱ्यांची लॉबी शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा डोकेदुखी सिद्ध होत असल्याचे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. अशातच आता कांदा प्रश्न संदर्भात अहमदनगरच्या एका शेतकरी पुत्राने थेट राष्ट्रपतींकडे साकडे घातल आहे.

या शेतकरी पुत्राने कांद्याला अनुदान द्यावे अशी मागणी न करता कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने कांदा पिकावर रोटर फिरवण्यासाठी अनुदानाची मागणी केली आहे. यावरून या शेतकरी पुत्राने सध्या बळीराजाची होणारी आर्थिक कोंडी निदर्शनास आणून देण्याचे काम केलं आहे. या शेतकरी पुत्राने कांदावर रोटर फिरवण्यासाठी किमान दोन हजार रुपये प्रति एकर या पद्धतीने अनुदान द्यावे अशी मागणी केली आहे. यामुळे सध्या या भावनिक पत्राची आणि या पत्रातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मांडलेली व्यथा संपूर्ण महाराष्ट्रात वेगात व्हायरल होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील शुभम गुलाबराव वाघ असे या नवयुवक शेतकरी पुत्राचे नाव आहे. कांदा पिकातून अपेक्षित असे उत्पादन मिळत नसल्याने शेतकरी बांधव अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेल्या कांद्यावर रोटर फिरवत आहेत. यामुळे निदान रोटर फिरवण्यासाठी तरी अनुदान द्यावे या त्याच्या भावनिक मागणीमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

शुभम गुलाबराव वाघ यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना लिहिलेलं पत्र खालीलप्रमाणे : 

“आज शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. त्यांनी पिकवलेल्या शेतमालाला काही दर मिळत नसल्याने उभ्या पिकात रोटर फिरवावा लागत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजारात चेष्टा केल्याप्रमाणे 500 ते 600 किलो कांदा विकून फक्त दोन रुपयांची पट्टी हातात मिळतेय. कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. कोबी, फ्लॉवर, कांदा आणि मोठा खर्च करून केलेली केळीच्या बागेतही रोटर फिवरण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे,”

“एकीकडे महागाई वाढल्यामुळे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. पण खर्चाच्या निम्म्या रकमे इतकाही नफा शेतकऱ्यांना मिळत नाहीये. तसेच शेतमाल निर्यात होत नसल्याने बाजारात आवक वाढतेय. त्यामुळे आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला कवडीचाही दर मिळत नाहीये.”

“आता शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतोय. कुठलही पीक केलं तरी तिचं अवस्था निर्माण होतेय. पण त्याच्याकडे दुसरा पर्याय तरी आहे का? म्हणूनच माय-बाप सरकार तुम्हीच याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.”

“शेतात साधा रोटर फिरवायचा म्हटलं तरी 2000 ते 2500 रुपये लागतात. जिथे मोठ्या आशेने लावलेल्या पिकाला कवडीमोल दर मिळत असल्याने त्या पिकात आज शेतकरी रोटर फिरवत आहे. जिथं शेतमालचं विकला नाही, तर तिथं शेतकऱ्याला रोटर फिरवायलाही उसनवारी करावी लागतेय. शेतीमालाला चांगला दर मिळाला तरी ही वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही.”

आज शेतकऱ्यांना 2 रुपये एवढी कांद्याची पट्टी मिळतेय, पण तोच कांदा बाजारात सामन्यांना 20 रुपये किलोने विकला जातोय. मग शेतकऱ्यांची कोंडी आणि कोणाची चांदी होतेय? शेतकरी राजाने फक्त काबाड कष्टच करायचं का? शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, पण आज या पोशिंद्यावरच काय वेळ आली आहे.

आधीच लेकरांच्या तोंडाचा घास घेऊन उसनवारी करून पीक जोमात आणले. पण आता त्यालाच कवडीचा दर मिळतोय. म्हणूनच निदान भाव नसलेल्या पिकात रोटर फिरवण्यासाठी जगाच्या पोशिंद्याला किमान प्रति एकर 2 हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे, ही कळकळीची विनंती आहे,”

अहमदनगर येथील जामखेड मधील शुभम गुलाबराव वाघ यांनी लिहिलेले हे भावनिक पत्र सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले असून या पत्राच्या निमित्ताने तरी मायबाप शासनाला जाग येईल आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अपेक्षित भाव मिळेल अशी अशा व्यक्त होत आहे.