लेका मन जिंकलंस ! ऊसतोड मजुराच्या लेकाच एमपीएससीत घवघवीत यश; राज्यात प्रथम येत बनला अधिकारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beed News : राज्यात यूपीएससी नंतर सर्वात कठीण समजली जाते ती एमपीएससीची परीक्षा. या परीक्षेसाठी राज्यभर लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. या लाखो विद्यार्थ्यांपैकी काही शेकडोच विद्यार्थ्यांची अधिकारी म्हणून या परीक्षा अंतर्गत निवड होत असते. याच शेकडो विद्यार्थ्यांमध्ये बीड जिल्ह्यातील एका ऊसतोड कामगार दांपत्याच्या लेकाने आपली जागा पक्की केली असून आपलं अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केल आहे.

विशेष बाब म्हणजे एनटीडी प्रवर्गातून या ऊसतोड दांपत्याच्या लेकाने राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यामुळे या कष्टकरी बापाच्या लेकाचं अख्या महाराष्ट्रात कौतुक केलं जात आहे. जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मौजे सावरगाव घाट येथील ऊसतोड कामगार दांपत्याचा मुलगा संतोष आजिनाथ खाडे यांनी ही किमया साधली आहे.

यासोबतच जिल्ह्यातील चिखली गावातील नागेश राम लाड यांनी देखील एमपीएससी मध्ये घवघवीत यश मिळवलं आहे. विशेष बाब म्हणजे नागेश यांनी स्वतः ऊसतोड काम केला आहे. यामुळे त्यांचा ऊसतोड कामगार ते अधिकारी हा प्रवास तरुणाईतील नवयुवकांसाठी मोठा प्रेरणादायी सिद्ध होणार आहे. यावेळी नागेश यांनी आई-वडिलांच्या कष्टाच चीज झाल्याचं म्हटलं असून आई आणि बापू माझ आयुष्य शून्य असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केला आहे.

तर सावरगाव घाट येथील संतोष यांनी आई वडिलांच्या कष्टामुळे आणि गावातील गावकरी माझ्यामागे भक्कमपणे उभे राहिले असल्याने हे यश मला संपादित करता आले असल्याची भावना यावेळी बोलून दाखवली. निश्चितच या कष्टकरी आई-वडिलांच्या लेकरांनी जिद्दीने, मेहनतीने स्वबळावर अभ्यास करत प्रतिकूल परिस्थितीतूनही घवघवीत असं यश संपादित केलं जाऊ शकतं हे दाखवून दिला आहे.

विशेष म्हणजे या दोघा अधिकाऱ्यांचं हे यश केवळ एमपीएससी करणाऱ्या तरुणांना करत राहणार आहे असं नाही तर सामान्य जीवनातील अन कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तींसाठी या दोन तरुणांनी ज्या पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या अपार मेहनतीने, जिद्दीने आणि कल्पक बुद्धीने एमपीएससी सारखी खडतर परीक्षा पास करून अधिकारी बनण्याचा बहुमान मिळवला आहे हा प्रवास प्रेरणा देणार राहणार आहे. अडचणीवर मात करून यशासाठी धडपड करणाऱ्या व्यक्तींना निश्चितच यश हे मिळत असतं हीच आजची ही यशोगाथा ओरडून सांगत आहे.