रामजी मानलं बुवा…! 2 एकरात पपईच्या शेतीतुन कमवला 8 लाखांचा नफा ; पंचक्रोशीत रंगली एकच चर्चा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story : शेती म्हटलं की अलीकडे नवयुवक शेतीत काय ठेवलंय असा ओरड करतात. विशेष म्हणजे कित्येक प्रयोगशील शेतकरी आपल्या पाल्यांना आता शेतीऐवजी नोकरींसाठी प्रेरित करत आहेत. आपल्या मुलाने चांगले उच्च शिक्षण घेऊन एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून काम करावे असं स्वप्न आता शेतकरी पाहू लागले आहेत.

खरं पाहता, शेती व्यवसायात सातत्याने कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी गारपीट या अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतीकडे अनेकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील शेतीतून लाखोंची कमाई केली जाऊ शकते, हे दाखवून दिले आहे तुळजापूर तालुक्यातील एका परीक्षण शेतकऱ्याने.

तालुक्यातील खुदावाडी येथील राम शिवाप्पा जवळगे या शेतकऱ्याने पपईच्या शेतीतून लाखोंची कमाई केली आहे. रामजी यांनी आपल्या दोन एकर शेत जमिनीत पपईची अतिवृष्टी मध्ये लागवड केली.

मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील योग्य नियोजन आखून दोन एकरात आठ लाखांची कमाई केली. यामुळे सध्या त्यांची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. उसाच्या शेतीपेक्षा पपईच्या शेतीतून चार पट अधिक उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

राम यांनी सांगितल्याप्रमाणे जानेवारी 2022 मध्ये त्यांनी पपईची लागवड केली. 15 नंबर जातीच्या पपईची त्यांनी लागवड केली अन जुन-जुलै महिन्यात पपई पिकापासून उत्पन्न मिळाले. पपई लागवड करण्यासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत जवळपास दीड लाखांचा खर्च आला. यामध्ये रोपांचा, ड्रीपचा खतांचा तसेच मजुरीचा खर्च सामील आहे.

दीड लाख रुपये खर्चून त्यांनी उत्पादित केलेल्या पपईला 20 ते 28 रुपये प्रति किलो दरम्यान दर मिळालेत. पपई ही वाशिम मुंबई तसेच राजधानी दिल्लीतील बाजारात विक्रीसाठी गेली आहे. दीड लाख रुपये खर्च वजा करून त्यांना पपईच्या पिकातून आठ लाखांचा निव्वळ नफा राहिला आहे.

निश्चितच एकीकडे शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला असताना राम यांनी शेतीतून केलेली ही कमाई इतरांसाठी प्रेरक ठरणार आहे. यावेळी कमी खर्चात आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी शेती करावी असं राम यांनी नमूद केलं.