नादखुळा ! प्रयोगशील शेतकऱ्याने ‘या’ जातींचे द्राक्षे रोप लागवडीनंतर मात्र 11 महिन्यात घेतलं एकरी सात टनाचे उत्पादन; 40 एकरात होणार 200 टन द्राक्ष उत्पादन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Grape Farming : भारतीय शेतीत काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. आता शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांना बगल देत फळबाग पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. विशेष बाब म्हणजे फळबाग शेतीतून शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन अन उत्पन्न देखील आता मिळू लागले आहे. फळबाग शेतीमध्ये शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि प्रगत वाणाचा वापर सुरु केला आहे.

फळबाग पिकांमध्ये अलीकडे डाळिंब आणि द्राक्ष शेती आपल्या राज्यात वधारू लागले आहे. द्राक्ष शेती नासिक सांगली सह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जात आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकरी कुटुंबाने द्राक्ष शेतीमध्ये अभूतपूर्व अशी कामगिरी करत 40 एकरात दोनशे टन इतके विक्रमी उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.

जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बोरजाईनगर आमनापुर येथील अरुण माळी व कुटुंबीयांनी द्राक्ष शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाच्या आणि जातीच्या वापरातून विक्रमी उत्पादन घेऊन दाखवले आहे. प्रयोगशील द्राक्ष उत्पादक शेतकरी अरुण माळी व कुटुंबीय 1984 पासून द्राक्षाची शेती करत आहेत. सध्या ते आपल्या 40 एकर क्षेत्रावर द्राक्षाची शेती करत आहेत. विशेष म्हणजे या वर्षी त्यांनी द्राक्षाच्या नवीन रोपाची लागवड करून मात्र 11 महिन्यात त्यापासून उत्पादन मिळवले आहे. उत्पादन मिळवायला सुरुवात केली यात काही विशेष नाही मात्र एकरी तब्बल सात टनाचे उत्पादन त्यांनी घेऊन पुन्हा एकदा द्राक्ष शेतीमधील त्यांची कसब अधोरेखित केली आहे.

त्यांच्या या प्रयोगाची सध्या पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगत आहे. माळी कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आठ मार्च रोजी द्राक्षाच्या नवीन रोपांची लागवड केली. आपल्या सव्वा दोन एकर क्षेत्रात या नवीन रोपांची लागवड करण्यात आली. किंगबेरी आणि कृष्णा या दोन द्राक्ष जातींची लागवड त्यांनी केली. लागवड केल्यानंतर पीक व्यवस्थापनाच्या आवश्यक त्या सर्व बाबी काटेकोर सांभाळून 25 ऑक्टोबरला या नव्याने लागवड करण्यात आलेल्या द्राक्ष प्लॉटचीं छाटणी करण्यात आली.

छाटणी पासून मात्र 110 दिवसात यातून त्यांना उत्पादन मिळायला सुरुवात झाली असून विक्रमी उत्पादन त्यांनी मिळवून दाखवले आहे. खरं पाहता द्राक्षे लागवड केल्यानंतर जवळपास अडीच वर्ष द्राक्ष बागेतून उत्पादन शेतकरी घेत नाहीत. मात्र त्यांनी योग्य नियोजन आखून नव्याने लागवड करण्यात आलेल्या द्राक्ष बागेचे योग्य पोषण व्यवस्थापन करत विक्रमी उत्पादन प्राप्त करून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. या नव्याने लागवड करण्यात आलेल्या सव्वादोन एकर क्षेत्रात एकरी सात टन इतकं द्राक्षाचे उत्पादन त्यांना मिळाले असून सध्या स्थितीला चाळीस एकर क्षेत्रावर त्यांचीं द्राक्षाची बाग आहे.

यामध्ये कृष्णा, सरिता, नानासाहेब परपल, ज्योती, किंग बेरी या काळया जातीच्या द्राक्षांचा समावेश असून माणिक चमन, सुपर सोनाका, अनुष्का, सोनाका, दनाका या पांढऱ्या द्राक्षांच्या व्हरायटी देखील त्यांनी लागवड केल्या आहेत. या चाळीस एकरातून त्यांना यंदा तब्बल दोनशे टन द्राक्षाचे उत्पादन मिळणार असून वेगवेगळ्या देशात आपला माल निर्यात करण्याचं त्यांनी ठरवले आहे. निश्चितच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना हवामान बदलाचा मोठा फटका बसत असतानाच माळी कुटुंबीयांनी द्राक्ष शेतीत साधलेली ही किमया इतर प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.