देशी गाईच्या शेणापासून बनलेल्या प्लास्टरने बनवले वातानुकूलित घर, सिमेंटच्या घरापेक्षा कमी खर्च !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

देशी गाईच्या शेणाचा विचार केला तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून या शेणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. या शेणापासून रंग देखील बनवण्यात येत आहे. परंतु याही पुढे जात हरियाणा येथील डॉ. शिवदर्शन मलिक  यांनी देशी गाईच्या शेणापासून वैदिक प्लास्टर तयार केले असून याचा वापर करून घरांची निर्मिती केलेली आहे. शिवदर्शन मलिक यांची एकंदरीत पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी रसायनशास्त्रामध्ये पीएचडी केली असून त्यानंतर त्यांनी आयआयटी दिल्ली, वर्ल्ड बँक इत्यादी मोठ्या संस्थांमध्ये सल्लागार म्हणून बरेच वर्षे काम केलेले आहे.

या दरम्यान त्यांनी बरीच जगभ्रमंती केली आणि ही भ्रमंती करत असताना त्यांना कच्च्या आणि पक्या घरांमध्ये काय फरक असतो हे समजून घेतले. साधारणपणे सन 2005 मध्ये त्यांनी वैदिक प्लास्टर बनवण्याची सुरुवात केली. या वैदिक प्लास्टरच्या वापर करून ग्रामीण भागामध्ये घरे बांधण्यात आली. ही घरे अनेक वैशिष्ट्यपूर्ण  असून पक्या घरांपेक्षा खूप महत्वाची अशी याची वैशिष्ट्ये आहेत.

 वैदिक प्लास्टरचा वापर करून केली घरांची निर्मिती

दिल्ली पासून जवळजवळ 70 किलोमीटर असलेल्या रोहतक येथे राहणारे डॉ. शिवदर्शन मलिक यांनी देशी गायीच्या शेणाचा वापर करून वैदिक प्लास्टर तयार केले व याचा वापर करून त्यांनी ग्रामीण भागामध्ये अगदी आरामदायी आणि एयर कंडीशन ची गरज पडणार नाही अशा घरांची निर्मिती केली. याच माध्यमातून दिल्ली येथील द्वारका जवळील छावला या ठिकाणी राहणाऱ्या दया किशन शौकीन यांनी दीड वर्षांपूर्वी वैदिक प्लास्टरचा वापर करून घर बनवले.

तेव्हा या घराचे फायदे सांगतांना त्यांनी म्हटले की, वैदिक प्लास्टरचा वापर करून बनवलेल्या घरांमध्ये उन्हाळ्यात देखील एअर कंडिशनर अर्थात एसी लावण्याची गरज नाही. जर उन्हाळ्यामध्ये बाहेरील तापमान जर 40 अंश डिग्री सेल्सिअस असेल तर या घरांमध्ये आतील तापमान फक्त 28 ते 31 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत राहते.

जर हे घर बांधायचा खर्चाचा विचार केला तर दहा रुपये पर स्क्वेअर फुट एवढा खर्च येतो. म्हणजेच सिमेंटच्या वापराच्या तुलनेत हा खर्च सहा ते सात टक्क्यांनी कमी आहे. तसेच या वैदिक प्लास्टर चा वापर करून तयार केलेल्या घरात उन्हाळ्यामध्ये फरशीवर जर अनवाणी पायाने फिरले तरी पायांना खूप थंडावा मिळतो. म्हणजे आपल्या शरीराला आवश्यकतेनुसार तापमान या घरामध्ये आपल्याला मिळत असते. तसेच विजेचे देखील बचत होते. या घरांचे महत्त्व ओळखून आता भारतामध्ये 300 पेक्षा जास्त लोकांनी वैदिक प्लास्टरचा वापर करून घरे बांधले आहेत.

 वैदिक प्लास्टर बनवण्याची सुरुवात

सन 2005 मध्ये डॉ. शिवदर्शन मलिक यांनी वैदिक प्लास्टर बनवायला सुरुवात केली. याविषयी बोलताना त्यांनी म्हटले की, आपण निसर्गासोबत राहत असताना निसर्गाला वाचवणे देखील महत्त्वाचे आहे. अगोदर शेणाने घरांचे लिंपण केले जायचे. कालांतराने ते बंद झाले आणि त्यानंतर अनेक आजार वाढायला सुरुवात झाली. या वैदिक प्लास्टर बनवण्यासाठी देशी गाईच्या शेणाचा वापर केला गेला असून या शेणांमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते व यामुळे घराची हवा देखील शुद्ध असते. त्यामुळे वैदिक प्लास्टर बनवण्यासाठी देशी गाईच्या शेणाचा वापर केला गेला असे देखील शिवदर्शन मलिक यांनी म्हटले.

पुढे बोलताना डॉ. शिवदर्शन मालिकांनी म्हटले की देशामध्ये प्रति दिवसाला 30 लाख टन शेण मिळते. परंतु त्याचा योग्य पद्धतीने उपयोग केला जात नाही व त्यामुळे बरेच शेण वाया जाते. देशी गाईच्या शेणाचा विचार केला तर त्यामध्ये जिप्सम, लिंबू पावडर आणि चिकणी माती इत्यादी मिसळून हे वैदिक प्लास्टर तयार करण्यात आलेले आहे.

विशेष म्हणजे हे वैदिक प्लास्टर अग्नीरोधक आणि उष्णता रोधक आहे. त्यामुळे याचा वापर करून स्वस्त आणि पर्यावरण पूरक घरे बनवणे शक्य आहे. महत्वाचे म्हणजे वैदिक प्लास्टरची मागणी आता ऑनलाईन पद्धतीने होत असून हिमाचल प्रदेश ते कर्नाटक व गुजरात तसेच पश्चिम बंगाल राज्यामध्ये वैदिक प्लास्टर चा वापर करून 300 पेक्षा जास्त घरे तयार करण्यात आलेली आहेत.