मराठमोळ्या शेतकऱ्याची केळी इराकच्या दारी ! सोलापूर जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्याचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी, वाचा ही यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story : गेल्या काही वर्षापासून उत्पादन वाढीच्या अनुषंगाने शेतीमध्ये रासायनिक खतांचा भरमसाठ वापर सुरू झाला आहे. त्याचा परिणाम सुरुवातीच्या काही वर्षात शेतकऱ्यांसाठी सुखद राहिला. मात्र आता रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. परिणामी उत्पादनात देखील घट होत आहे. एवढेच नाही तर रासायनिक खतांपासून तयार झालेल्या शेतमालामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम पाहायला मिळत आहेत.

या परिस्थितीत शासनाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एवढेच नाही तर काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय शेतीची कास धरायला सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्ह्यातही एका प्रयोगशील शेतकऱ्याने असाच सेंद्रिय शेतीचा एक भन्नाट प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मौजे बाभूळगाव येथील विलासराव पाटील नामक शेतकऱ्याने रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करून केळीची शेती सुरू केली.

यामुळे त्यांना चांगले दर्जेदार उत्पादन मिळाले. उत्पादन तर चांगले मिळालेच शिवाय सेंद्रिय पद्धतीने केळी उत्पादित केली असल्याने या केळीचा दर्जा इतर केळीच्या तुलनेत चांगला ठरला आणि या केळीला इराक मध्ये निर्यात करण्यात आले. परिणामी सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या या केळी पिकातून विलासराव यांना चांगली कमाई झाली आहे. विलासराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे एकूण 17 एकर शेत जमीन आहे. जेव्हापासून ते शेती करत आहेत तेव्हापासून त्यांनी रासायनिक खतांचा वापर बंद केला आहे.

सेंद्रिय खतांसाठी प्रामुख्याने शेणखताचा वापर होतो. यासाठी त्यांनी चार गिर गाई आणि तीन देवणी जातीच्या गायी देखील पाळल्या आहेत. गाईचे शेण आणि गोमूत्र पासून ते जीवामृत, घनामृत, गो कृपामृत, बीजामृत असे सेंद्रिय खत तयार करून या खताच्या वापराने पिकाचे उत्पादन घेत आहेत. पूर्वी ते उसाचे उत्पादन घेत मात्र उसाच्या उत्पादनासाठी भरमसाठ रासायनिक खतांचा वापर करावा लागतो.

त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते शिवाय जमीन देखील नापीक बनते. एवढे करूनही उत्पादित केलेल्या ऊसाला वेळेवर पेमेंट मिळत नाही. परिणामी त्यांनी ऊस पिक घेणे टाळले आणि आता ते आपल्या शेतीत शेवगा, केसर आंबा, केळी, कलिंगड, तैवान पेरू यांसारखी पिके घेत आहेत. या सर्व पिकांसाठी गोमुत्रामध्ये ताक व गुळ मिसळून तयार करण्यात आलेल्या सलरीचा वापर होतो. त्यांनी पाच एकरात शेवगा पिक लावली असून यातून त्यांना चांगले उत्पादन मिळत आहे.

दरवर्षी साधारण 30 ते 40 टन माल त्यांना शेवगा पिकातून मिळत आहे. केसर आंब्यापासून यावर्षीपासून उत्पादन मिळणार असून साधारणता 6 टन माल त्यांना मिळणार आहे. यासोबतच अडीच एकरात तैवान पेरूची त्यांनी शेती सुरू केली आहे. तसेच केळीचे पीक आता इराकला निर्यात होत आहे. शेतीसोबतच त्यांनी गाईंचे देखील संगोपन केले असून यातून जे दूध मिळतं ते आपल्या कुटुंबासाठी वापरत आहेत.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना 300 टन केळीच दरवर्षी उत्पादन मिळतं. निश्चितच पूर्णपणे सेंद्रिय शेती करून एवढे दर्जेदार उत्पादन मिळवत त्यांनी सेंद्रिय शेती तोट्याचे म्हणणाऱ्या अनेकांना आरसा दाखवण्याच काम केला आहे. एकंदरीत सेंद्रिय शेतीचा हा विलासरावांचा प्रयोग राज्यातील इतर प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी देखील मार्गदर्शक राहणार आहे.