घरच्यांचा विरोध आणि लोकांनी केली मस्करी तरी न जुमानता सफरचंदाची शेती केली यशस्वी! वाचा या शेतकऱ्याची यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बऱ्याचदा व्यक्ती काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो परंतु लागलीच लोक टोमणे मारायला लागतात किंवा मस्करी करायला लागतात. हा अनुभव प्रत्येकाला येतो. परंतु यशस्वी होण्याचा ध्यास ठेवलेले व आपले ध्येय पूर्ण करण्याची चिकाटी असलेली व्यक्ती असल्या क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष देत नाही व आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून त्या दिशेने मार्गक्रमण करतात व यशस्वी होतात.

यशस्वी व्यक्तींना अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावेच लागते. असाच प्रकार शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत देखील घडतो. काही शेतकरी काहीतरी नवीन पीक लागवडीचा प्रयोग करतात. परंतु लोकांचे फुकटचे सल्ले मध्ये चालू होतात. हे करू नको हे आपल्याकडे येणार नाही किंवा हे परवडत नाही असे अनेक प्रकारचे वाक्य आपल्या कानी येतात.

परंतु याकडे लक्ष न देता जे व्यक्ती ठरवलेले काम पूर्ण करतात ते यशस्वी होतातच. याच पद्धतीने जर आपण सोलापूर जिल्ह्यातील धनंजय शेळके या प्रयोगशील शेतकऱ्याचा विचार केला तर त्यांना देखील अशाच लोकांच्या टोमणे आणि चेष्टेला सामोरे जावे लागले. परंतु शेळके हे मागे न हटता त्यांनी चिकाटीने सफरचंद लागवड केली व तो पिकवून दाखवला. याच शेळके यांची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 धनंजय शेळके यांनी फुलवली सफरचंदाची बाग

पंढरपूर तालुक्यातील धनंजय शेळके हे प्रयोगशील शेतकरी असून तब्बल अडीच वर्षाची मेहनत आणि कष्टाने त्यांनी सफरचंद फुलवला असून अवघ्या दहा गुंठा मध्ये त्यांनी प्रयोग करत सफरचंदाची बाग यशस्वी केली आहे. परंतु आज शेतामध्ये झाडांवर जी काही लगडलेली सफरचंद आहेत इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास त्यांचा सोपा नव्हता. जर त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर ते घरातले एकुलते एक असून ते मूळचे मोहोळ तालुक्यातली आहेत.

परंतु पंढरपूर तालुक्यातील देगाव येथे ते मामाच्या गावी स्थायिक झाले. एम ए इंग्रजी मध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केले व नंतर कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग शिकल्यानंतर त्यांनी कंपनीमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. कारण घरात एकटाच कमावणारे असल्यामुळे त्यांना नोकरी करावी लागली परंतु त्या ठिकाणी फिरतीचे काम होते परंतु त्या दृष्टिकोनातून पगार मात्र खूप कमी होता. परंतु तरीदेखील त्यांनी सात वर्षे नोकरी केली.

काही कालावधीनंतर कंपनीने पगार अचानक कमी केला व यामुळे धनंजय यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. घरच्यांकडे त्यांनी त्यांच्या एकूण शेतीतून दहा गुंठे जमीन सफरचंद प्रयोगासाठी मागितली. परंतु याला घरच्यांचा विरोध होता. परंतु त्यांनी घरच्यांना व्यवस्थित समजावून त्यांचे मन वळवले व वडिलांचे परवानगी घेतली. त्यानंतर त्यांनी प्रयोग करण्याआधी इंटरनेटच्या मदतीने सफरचंद शेती विषयी तपशीलवार  माहिती मिळवली.

कायमच सफरचंद लागवड या विषयावरच ते बोलत व त्या विषयांमध्ये पूर्णपणे गुंतून राहिले. त्यांच्या वडिलांना वाटत होते की मुलगा अशक्य वाटणारी गोष्ट करत आहे. परंतु घरच्यांचा विश्वास संपादन करत त्यांनी सफरचंद लागवड करायचे ठरवले व उष्णकटिबंधामध्ये देखील सफरचंद चांगले येऊ शकेल असे आठ ते दहा वान असल्याचे त्यांना कळले व त्यानुसार ते तयारीला लागले. आधी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील एका रोपवाटिकेतून डोर सेट गोल्डन, हरमन 99 यासारख्या वाणांची रोपे खरेदी केली व त्यासाठी 17000 रुपये खर्च केला.

आपल्याकडील उष्ण वातावरणाच्या अनुषंगाने त्यांनी लागवडीसाठी दहा बाय बारा आणि बारा बाय बारा लागवडीसाठी आंतर निवडले. सफरचंदाची लागवड केल्यानंतर आंतरपीक म्हणून त्यांनी गवार, कलिंगड तसेच लसूण इत्यादी पिकांची आंतरपीक म्हणून लागवड केली व यातून त्यांना 13000 रुपयांचे उत्पन्न मिळाले. तसेच कलिंगडच्या माध्यमातून देखील त्यांना चांगले पैसे मिळाले व रोपांसाठी केलेला खर्च त्यांनी त्यातून काढला.

सफरचंदाची लागवड केल्यापासून ते सफरचंदाचा ध्यास घेऊन शेतात काम करू लागले व राहिलेल्या वेळात मोबाईलच्या माध्यमातून सफरचंद पिकाबद्दल माहिती मिळवू लागले. यामध्ये त्यांनी पिकाला कुठले अन्नद्रव्य लागतात तसेच कुठले रोग यावर येतात याचा बारकाईने अभ्यास केला. एवढेच नाही तर खोडकिडा तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता व त्यामुळे पानांवर होणारा विपरीत परिणाम, आयर्न क्लोरोसिस, बुरशी यासारख्या 31 रोग आणि किडींचा अभ्यास त्यांनी मोबाईलच्या माध्यमातून केला व यावर सेंद्रिय पद्धतीने कशा पद्धतीने मात करायची याचे पुरेपूर ज्ञान त्यांनी मिळवले व आत्मसात केले.

आज पाहिले तर त्यांच्या कष्टाला यश आले असून शेतातील सफरचंदाला आता बहर येऊ लागला आहे व तो पाहायला परिसरातील शेतकरी तसेच कृषी अधिकारी व पत्रकार देखील शेताला भेट देत आहेत. त्यांनी पिकवलेल्या सफरचंदाची चव थोडीशी आंबट गोड अशी असल्याने ती खाणाऱ्या व्यक्तीला आवडत आहे. हा पहिलाच प्रयोग होता व यामधून त्यांना कळले की सफरचंदाचा बहार हा चौथ्या वर्षी घेणे चांगले असते.

सुमारे 100 ते 150 ग्राम वजनाचे  फळ त्यांच्या झाडांवर असून  मे ते जुन कालावधीत सफरचंदाचा बहार येतो व एका झाडाला त 15 किलो पर्यंत उत्पन्न मिळत आहे. हा प्रयोग होता म्हणून त्यांनी अकराव्या महिन्यात सफरचंदाचा बहार घेतला होता. कारण घरच्यांचा विरोध आणि लोकांची टोमणे इत्यादी मुळे घरच्यांचा व लोकांचा विश्वास बसावा म्हणून तो बहार लवकर घेतला असे धनंजय शेळके यांनी सांगितले. परंतु पुढील बहार आता ते चार वर्षांनीच घेणार आहेत.

 सेंद्रिय पद्धतींचा वापर ठरला महत्त्वाचा

धनंजय शेळके यांनी सफरचंदाची शेती सेंद्रिय पद्धतीने केली असून याकरिता जीवामृत तसेच सेंद्रिय खत व हरळ सारख्या गवताचा देखील खुबीने वापर केला आहे. पाणी व्यवस्थापनासाठी ड्रीप चा वापर केला असून त्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन ते करतात. हरळ नावाचे तन त्यांनी शेतात तसेच ठेवले आहे व त्याची नींदणी केली नाही.

कारण हरळ हे जमिनीतील जास्तीचे पाणी शोषून घेते व त्यामुळे फायदा होतो व जर कीड आली तर ती सर्वप्रथम या हरळीवर येते म्हणून त्यांनी निंदनी न करता हरळ तशीc शेतात राहू दिली. तसेच यामुळे जमिनीवर आच्छादन देखील राहिले व उन्हाचा देखील त्रास झाडांना झाला नाही.

तसेच मातीत असलेल्या गांडूळांना देखील या आच्छादनामुळे त्रास झाला नाही व त्यांचे प्रमाण टिकून राहिले. तसेच तुळशीचे रोप देखील त्यांनी प्रत्येक रांगेच्या शेवटी लावले असून अंजीर व अवाकॅडो सारखी फळझाडे देखील शेतात लावली असून मिश्र पीक पद्धतीचा वापर ते करत आहेत.

अशा पद्धतीने त्यांनी घरच्यांचा विरोध आणि लोकांचे टोमणे याकडे साफ दुर्लक्ष करत सफरचंद लागवडीचे ध्येय पूर्ण केले व यशस्वी झालेत.