भाऊ असावा तर असा: लहान भावाने केला मोठ्या भावाचा शिक्षणाचा खर्च, सलग सात वेळेस अपयश पचवून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संपत्तीसाठी व इतर गोष्टींकरिता दोन सख्ख्या भावांमध्ये टोकाला पोहोचलेले वितुष्ट आपण पाहतो. कधीकधी हे वाद अनेक टोकाचे पाऊल उचलण्यास देखील प्रवृत्त करतात. अनेकदा  प्रकरणे कोर्टकचेरीच्या दारात जाऊन पोहोचतात. परंतु पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीर या ठिकाणाचे दोन भावांची कहाणी यापेक्षा खूप वेगळी आहे. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेला दिनेश आणि त्याचा लहान भाऊ संकेत यांचे बंधुप्रेम कौतुकास्पद म्हणावे लागेल.

 सात वेळा अपयश येऊन देखील शेतकऱ्याच्या मुलाने घातली पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, पुरंदर तालुक्यात असलेले प्रसिद्ध देवस्थान श्रीक्षेत्र वीर या ठिकाणाचे दिनेश मारुती धसाडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत सोळावा क्रमांक मिळवत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. परंतु दिनेश यांच्या या यशा मागील जर संघर्ष पाहिला तर सोपा नाही.

घरची अवघी दीड एकर शेती, त्यांचे वडील मारुती धसाडे हे शेतकरी तर आई निता धसाडे या आठवडे बाजारात भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. धसाडे दाम्पत्याला दिनेश आणि संकेत असे दोन मुले असून मारुती धसाडे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना अवघ्या दीड एकर शेतीच्या उत्पन्नावर उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. घरच्या परिस्थितीची जाण ही दोन्ही मुलांना होती.

घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे दिनेशंचा लहान भाऊ संकेत याने गावांमध्ये मिळेल ते काम करायला सुरुवात केली व कुटुंबाला आर्थिक हातभार लावला. परंतु संकेतने निश्चय केला की जे काम मिळेल ते करायचे परंतु मोठ्या भावाला शिक्षणासाठी पैसा पुरवायचा. अशा पद्धतीने दिनेशचा शिक्षणाचा प्रवास हा सुरू झाला. दिनेश याची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण श्रीक्षेत्र वीर येथील टागोर विद्यालयामध्ये झाले.

नंतर पुढील शिक्षणात त्यांनी सासवड या ठिकाणी करण्याचे ठरवले व सासवड येथील वाघिरे कॉलेजमधून विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.कष्टाने अभ्यास करून बारावी उत्तीर्ण केली.परंतु आर्थिक परिस्थितीमुळे वीर येथून सासवड या ठिकाणी शिक्षणासाठी जा ये करण्याचा खर्च त्यांना परवडण्यासारखा नव्हता. नंतर त्यांनी मित्र मिळून एक रूम भाड्याने घेण्याचे ठरवले.

 अशा पद्धतीने झाली शिक्षणाचा खडतर प्रवासाची सुरुवात

अशा पद्धतीने शिक्षणाची सुरुवात झाल्यानंतर दिनेश यांना दररोज घरून जेवणाचा डबा येऊ लागला. सकाळी आलेला डबा आल्यानंतर जेवण झाल्यावर जे उरेल तेच संध्याकाळी खाऊन त्यांनी दिवस काढले. मध्यंतरी आलेल्या कोरोनामुळे घरून येणारा जेवणाचा डबा देखील बंद झाला. परंतु घरी न येता मित्रांच्या घरून येणारा डब्यात जेवण करून त्यांनी दिवस काढले.परंतु या ठिकाणी शिक्षणाचा जो काही खर्च लागत होता तो सगळा  खर्च संकेत करत होता.

एवढेच नाही तर दिनेश यांनी देखील सासवड या ठिकाणी एका दुकानांमध्ये पार्ट टाइम काम करणे सुरू केले. इतक्या कष्टाच्या प्रवासात त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले व ही परीक्षा पास होण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास सुरू केला. त्यानंतर पहिल्या वर्षी अपयश आले परंतु खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला सुरुवात केली.विशेष म्हणजे दिनेश यांनी सात वर्ष सोशल मीडिया आणि मोबाईल यापासून दूर राहण्याचा निश्चय केला.

रोज दहा ते बारा तास सलग अभ्यास केला. सलग अपयश येत असताना देखील मोठे कष्ट आणि नियोजनबद्ध अभ्यासाच्या जोरावर सातव्या प्रयत्नात त्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. त्यांच्या या यशामुळे परिसरांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. यावरून दिसून येते की उमेद,जिद्द, मनात ठरवलेली इच्छा तडीस नेण्यासाठी करावी लागणारे कष्ट आणि नियोजनबद्ध अभ्यास या जोरावर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवता येते हे सिद्ध होते.