वाशीममध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : नागपूरसह विदर्भात काही ठिकाणी २० एप्रिलला रात्री दहा वाजता तुरळक पाऊस झाला. प्रादेशिक हवामान विभागातर्फे चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व वाशीममध्ये २१ एप्रिलला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला होता.

असे असताना विदर्भात बुलडाणा व गोंदियावगळता इतर सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान हे ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. रविवारी वाशीममध्ये सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात आणखी तीन दिवसांचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

मागील २४ तासांत नागपूरसह चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम व गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. यात यवतमाळ जिल्ह्यात २.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. ‘यलो अलर्ट’ असतानाही तापमानात घट झाली नव्हती.

सकाळपासूनच उन्हाने आपला रुद्रावतार दाखवण्यास सुरुवात केली होती. रविवारी अकोला येथे ४२.२, अमरावतीत ४१.४, बुलडाणा येथे ३७.६, चंद्रपूर येथे ४१.४, गडचिरोलीत ४२.०, गोंदियात ३९.८, नागपुरात ४०.६,

वर्धा येथे ४२.० तर यवतमाळ येथे ४०.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात किमान तापमानातही वाढ झाली आहे. तुरळक पावसामुळे वातावरणातील दमटपणा वाढला आहे.

नागपूरसह गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे सोमवार व मंगळवारकरिता तर वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ व वाशीम येथे सोमवार व बुधवारकरिता ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

‘यलो अलर्ट’मध्ये ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळवारा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.