स्वत:चे ठेवायचे झाकून, अन दुसर्‍याचे पहायचे….. या पध्दतीने महापौरांचा कारभार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :-शहर व महामार्गावरील खड्डयांमुळे सत्ताधारी भाजप व शिवसेनेमध्ये जुंपली असताना, महापौरांनी शहरात फिरुन नागरिकांचे प्रश्‍न जाणून घेण्याचे आवाहन समाजवादी पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष अजीम राजे यांनी केले आहे.

तर स्वत:चे ठेवायचे झाकून, अन दुसर्‍याचे पहायचे वाकून या पध्दतीने महापौरांचे कार्य चालू असल्याचा आरोप केला आहे. गेल्या दीड वर्षापासून शहरात महापौर एकदाही फिरकले नाहीत. सर्वसामान्य नागरिकांचे काय प्रश्‍न आहेत? याची त्यांना जाणीव नाही.

सर्वच रस्त्यावर इतके खड्डे पडले आहेत की, शहरातील रस्ते कुठे गेले? हा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. शहराचे महापौर बांधकाम अधिकारी यांना महामार्गावरील खड्ड्यांसाठी धारेवर धरत आहे. मात्र शहरात रस्त्यांचा थांगपत्ता नाही. केंद्रात भाजपची सत्ता, दक्षिणचे खासदार भाजपचे,

महापालिकेत सत्ता भाजपची रस्त्याचे काम मार्गी लावण्या ऐवजी महापौरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना काळे फासण्याचे केलेले वक्तव्य शोभत नसल्याचे अजीम राजे यांनी म्हंटले आहे. महापौरांनी शहरात कोणती विकास कामे केली ते त्यांनी दाखवून द्यावे.

शहरात ड्रेनेजलाईनचा प्रश्‍न गंभीर बनत असताना कोरोनापेक्षा साथीच्या आजारांनी रौद्ररुप धारण केले आहे. याची जाणीव देखील महापौरांना नाही. शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न काय आहेत? याची जाणीव महापौरांना राहिली नसून, घर आणि महापालिका यातच त्यांचा कारभार चालू आहे.

शहरात फिरुन नागरिकांचे प्रश्‍न केंव्हा जाणून घेणार? असल्याचा थेट सवाल समाजवादीचे शहराध्यक्ष राजे यांनी पत्रकाद्वारे केला आहे. शहरातील रस्ते व ड्रेनेजलाईनचा प्रश्‍न सोडविण्यासाठी तुम्ही बाहेर पडणार असाल तर नागरिकांच्या वतीने समाजवादी पार्टी आपले प्रथम स्वागत करेल. अन्यथा काळे फासण्याचा इशारा आंम्हाला देखील देता येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment