अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी राज्य शासनाकडून घोषणांचा पाऊस ! प्रत्यक्षात अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील मिरजगाव मंडलात सन २०२२/२३ मध्ये सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आले होते; परंतु हे अनुदान मिरजगाव येथील काही शेतकऱ्यांना अद्यापही मिळाले नाही.

नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान काही गावांतील शेतकऱ्यांना मिळाले. मात्र, मिरजगावातील शेतकरी नुकसानीचे पंचनामे होऊनदेखील अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे विचारणा केली असता, समाधानकारक उत्तर दिले जात नाही.

रखडलेले अनुदान तत्काळ वितरीत न झाल्यास येथील शेतकरी विलास हजारे, रामदास हजारे, मोहन गोरे, सुभाष हजारे, आण्णासाहेब गोरे, विष्णू काळे, कान्हू निर्मळ, अनिल कोल्हे, अंबर बनकर, अमोल बनकर, पप्पू बनकर, बाळू बरबडे यांच्यासह आदी शेतकऱ्यांमधून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यंदा पावसाने या भागात दडी मारल्याने हा भाग दुष्काळ सदृश्य जाहीर झाला आहे. त्यातच शेतकऱ्यांना दुष्काळातही अनुदान मिळण्याची वाट पाहावी लागत आहे. सततच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी अनुदान केव्हा मिळेल, याची वाट पाहत आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीत खरीप पिकांसह फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय जमिनीही खरडून गेल्या होत्या. यात सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी राज्य शासनाकडून घोषणांचा पाऊस झाला.

मात्र, प्रत्यक्षात अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहे. मिरजगाव हे कर्जत जामखेड मतदारसंघातील गाव असून, या भागात दोन आमदार व एक खासदार असूनही शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आल्याने नाराजीचा सूर निघत आहे.

■अतिवृष्टी व सततच्या पावसाच्या अनुदानाची रक्कम जमा करताना शेतकऱ्यांच्या खात्याची ई-केवायसी नसल्याचे कारण दिले जाते. मात्र, दोन-दोन वर्षे या शुल्लक बाबींसाठी यंत्रणा निधी देण्यास टाळाटळ करत आहे. मुळात ई-केवायसीसाठी दोन वर्षे कशासाठी लागतात, असा प्रश्न ही यानिमित्ताने शेतकरी वर्गामधून उपस्थित होत आहे.