अहमदनगर जिल्ह्यातील खळबळजनक घटना : खंडणी मागणाऱ्या ‘त्या’ पत्रकारास अखेर अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :-  माहिती अधिकार कार्यकर्ता तसेच पत्रकार असल्याचे भासवून राहुरीच्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडे वारंवार पैशाची मागणी करणाऱ्या देवळाली प्रवरा येथील इब्राहिम शेख या खंडणीखोरास राहुरी पोलिसांनी गजाआड केले.

या घटनेमुळे माहिती अधिकार व पत्रकारितेच्या नावावर ब्लॅकमेलिंग करणाऱ्या तथाकथित लोकांमध्ये खळबळ उडाली. तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी या प्रकरणी राहुरी पोलिसात फिर्याद दिली होती.

देवळाली प्रवरा येथील इब्राहिम शेख हा पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याचे भासवून तीन वर्षांपासून पैशाची मागणी करत ठोकळे व मंडल कृषी अधिकारी राहुल ढगे यांच्याकडून खंडणी वसूल करत होता.

मला महिन्याला दोन हजार रुपये द्या, नाही तर माहिती अधिकार तसेच कृषी विभागातील कारभाराची बातमी छापण्याची शेख याच्याकडून वारंवार धमकी दिली जात होती.

त्यामुळे महेंद्र ठोकळे यांनी राहुरी पोलिसात धाव घेतली. गुरुवारी शेख याने कृषी अधिकारी ठोकळे यांच्याकडे तीन हजारांची मागणी केली.

तडजोडी अंती दोन हजार रुपये देण्याचे ठरले. इब्राहिम शेख हा गुरुवारी दुपारी राहुरीच्या तालुका कृषी कार्यालयात जावून ठोकळे यांच्याकडून खंडणीची दोन हजार रुपये रक्कम रोख स्वरूपात घेतली.

यावेळी सापळा लावून बसलेल्या पोलिस नाईक विकास साळवे, रोहित पालवे, शशिकांत वाघमारे, रवींद्र कांबळे या पोलिस पथकाने झडप घालून शेख याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.