उत्कर्षा रुपवते यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी काल बुधवारी (दि.१७) काँग्रेस पक्षाच्या प्रदेश महासचिव पदासह काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

उत्कर्ष रूपवते या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये शिर्डीची जागा ठाकरे गटाला मिळाल्याने ठाकरे गटाकडून माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

यामुळे रूपवते यांचे आघाडीकडून निवडणूक लढविण्याचे स्वप्न अधूरे राहिले. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जागा वाटपामध्ये बदल केला जाईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र जागा वाटपात बदल होणे अवघड असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची काही दिवसांपूर्वी मुंबईत भेट घेतली.

रुपवते या वंचित आघाडीकडून निवडणूक लढवतील, अशी चर्चा त्यावेळी झाली. या पार्श्वभूमीवर त्यांनी काल काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. रुपवते यांच्या राजीनामामुळे त्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे चित्र तयार झाले आहे. रुपवते यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्यास महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहे.