महाविकास आघाडीकडून निलेश लंके नगर दक्षिणची निवडणुक लढवणार नाहीत ? आता या नावाची होतेय चर्चा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics News :  सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. नगर दक्षिणमध्ये तर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. मात्र या जागेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरत नसल्याचे वास्तव आहे. या जागेवर आत्तापर्यंत पारनेरचे आमदार निलेश लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे म्हटले जात होते. पण आता आमदार निलेश लंके यांनी यू टर्न घेतला असल्याच्या चर्चा आहेत.

आता नगर दक्षिण मधून महाविकास आघाडी कडून निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या उमेदवारी करणार अस बोललं जात आहे. स्वतःची आमदारकी वाचवण्यासाठी आपल्या पत्नीला निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी निलेश लंके यांनी केली असल्याचा दावा केला जातोय.

खरे तर लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. यासाठी त्यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष कार्यालयात जाऊन सुप्रिमो शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी निलेश लंके हे शरद पवार गटात जातील आणि हाती तुतारी घेऊन सुजय विखे यांना आव्हान देतील अशा चर्चा रंगल्या होत्या.

पण त्यांचा पक्षप्रवेश काही झाला नाही. परंतु, त्यावेळी त्यांनी साहेब म्हणजे शरद पवार जो आदेश देतील तो मान्य असेल असे म्हटले होते. शरद पवार यांनी देखील निलेश लंके यांचे स्वागत केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लंके हे अहमदनगर मधील लोकप्रिय नेते आहेत.

येथून त्यांना उमेदवारी मिळाली तर ते शंभर टक्के निवडून येतील असे म्हटले होते. लंके यांच्या बाबतीत आमचं असं म्हणणं आहे की ते आमचे उमेदवार व्हावेत, असं पाटील यांनी म्हटले होते. त्यावेळी पाटील यांनी लंके पक्ष कार्यालयात आल्यानंतर मी त्यांना तुतारी दिली होती आणि ती तुतारी त्यांनी स्वीकारली असे सांगितले.

मात्र ते अडचणीत येतील असे मी कोणतंच वक्तव्य करणार नाही अन उमेदवारीच्या बाबतीत योग्य वेळी सोपस्कार केला जाईल असे सांगितले. एकंदरीत पाटील यांनी निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाची कबुली दिली नाही मात्र शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशा चर्चा जीवित ठेवल्या होत्या.

आता मात्र निलेश लंके हे स्वतः निवडणूक लढवणार नाहीत तर त्यांची पत्नी राणी लंके या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहणार अशा नवीन चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. तथापि याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे महाविकास आघाडीकडून या जागेवर कोणाला उमेदवारी मिळणार हे खरच पाहण्यासारखे राहणार आहे.