Solar LED Light Trap: सेंद्रिय शेती करत आहात तर तुमच्यासाठी वरदान ठरतील सौर प्रकाश सापळे! वाचा संपूर्ण फायदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Solar LED Light Trap:- शेती आणि नवनवीन तंत्रज्ञान याचा घनिष्ठ आणि एकमेकांशी निगडित अशी बाब असून वेगवेगळ्या प्रकारचा तंत्रज्ञानाचा वापर आता शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. तसेच शेतीमध्ये आता रसायनमुक्त शेती म्हणजेच कुठल्याही प्रकारच्या कीटकनाशक किंवा रासायनिक खतांचा वापर न करता संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यावर देखील आता मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे व अशा शेतीला आता प्रोत्साहन देखील दिले जात आहे.

सेंद्रिय शेतीमध्ये पिकांचे उत्पादन हे संपूर्णपणे कुठल्याही प्रकारच्या रसायनांशिवाय घेणे अभिप्रेत असते. म्हणजेच तुम्हाला जर पिकांच्या भरघोस वाढीसाठी आवश्यक घटक द्यायचे असतील तर तुम्हाला रासायनिक खतांऐवजी त्याकरिता शेणखत किंवा कंपोस्ट खत तसेच गांडूळ खताचा वापर करणे क्रमप्राप्त आहे.

तसेच पिकांवर विविध प्रकारच्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव होत असतो व अशा कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी तुम्हाला रासायनिक कीटकनाशकांऐवजी इतर पर्यायांचा अवलंब करणे सेंद्रिय शेतीमध्ये अभिप्रेत आहे. या अनुषंगाने जर आपण पिकांवरील किडींवर नियंत्रण मिळवायचे असेल तर ते रासायनिक कीटकनाशके न वापरता कशा पद्धतीने मिळू शकते? हा फार मोठा प्रश्न सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडे उभा राहतो. परंतु या प्रश्नाचे जर आपण उत्तर शोधले तर सोलर एलईडी इंसेक्ट ट्रॅप अर्थात सौर प्रकाश सापळे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरु शकतात.

 सौर प्रकाश सापळे शेतकऱ्यांसाठी कसे आहेत वरदान?

याबाबत तज्ञ म्हणतात की, जे शेतकरी सेंद्रिय शेती करतात अशा शेतकऱ्यांकरिता सौर प्रकाश सापळे वरदान ठरु शकतात. कारण शेतकरी बंधू या सापळ्यांचा वापर शेतात करून पिकांवर येणाऱ्या किडींचे सहजपणे नियंत्रण करू शकतात. कारण सेंद्रिय शेतीमध्ये कीटकांच्या नियंत्रणासाठी फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे सौर प्रकाश सापळे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतात. या सापळ्यांच्या वापरामुळे शेतीचा खर्च कमी होतोच परंतु कीड देखील नियंत्रणात करता येते उत्पादन देखील चांगले मिळते.

 सौर प्रकाश सापळे कसे काम करतात?

सौर प्रकाश सापळे हे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून चार्जिंग केले जातात.यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची बाहेरून ऊर्जा पुरवण्याची गरज नसते. म्हणजेच तुम्हाला वीज लागत नाही. यामध्ये असलेली बॅटरी सूर्यप्रकाशाने चार्ज होते. या सापळ्यांच्या प्रकाश पाहिल्यानंतर कीटक त्या प्रकाशाकडे आकर्षित होतात व त्यानंतर या सापळ्यांना असलेल्या जाळीमध्ये ते अडकतात.

जेव्हा तुम्ही शेतामध्ये सौर प्रकाश सापळा बसवतात तेव्हा तो तेव्हा तो दिवसभर असलेल्या सूर्याच्या प्रकाशाने चार्जिंग होतो व नंतर रात्र जेव्हा होते तेव्हा बॅटरीचे बटन चालू केल्यानंतर त्यातून प्रकाश बाहेर पडतो. या प्रकाशामुळे कीटक त्या यंत्राकडे आकर्षित होतात व नंतर हे किडे  या सापळ्याला बसवलेल्या जाळ्यांमध्ये अडकतात व रात्री बाहेर पडणाऱ्या कीटकांना प्रामुख्याने हे आकर्षित करतात.

यांच्या माध्यमातून 375 नॅनो मीटर तरंग लांबीचे रेडिएशन उत्सर्जित करतात. यामध्ये अल्ट्राव्हायलेट निळा प्रकाश असतो. हे प्रकाश सापळे रात्री सात ते 11 या वेळेत कार्यान्वित करणे गरजेचे आहे. कारण रात्रीच्या या कालावधीतच बहुतेक किटकांचा विपरीत परिणाम हा पिकांवर होत असतो. या कालावधीत प्रकाश सापळे प्रज्वलित केले असल्यास त्या ठिकाणी किडे आकर्षित होतात व ते जाळ्यांमध्ये अडकतात व पिकांची या माध्यमातून सुरक्षितता होते.

 फेरोमेन ट्रॅप देखील आहे उपयुक्त

या मोठ्या आकाराच्या सौर प्रकाश सापळ्यांशिवाय एक लहान आकाराचा सौर प्रकाश सापळा देखील असतो. त्यामध्ये फेरोमोन सापळा बसवलेला असतो. या फेरोमोन सापळ्यामध्ये एक विशेष प्रकारचे रसायनाचा वापर केलेला असतो व यामुळे नर किडीला मादी कीटक असल्याचा भ्रम होतो व तो त्यामुळे आकर्षित होतो व त्या ठिकाणीच तो अडकतो. या सौर प्रकाश सापळ्यांमध्ये फेरोमोन सापळा देखील कनेक्ट केला गेला आहे व ज्यामुळे दुहेरी हेतू साध्य करण्यात आलेला आहे. हे फेरोमोन सापळे देखील सौर प्रकाश सापळ्यांसारखेच काम करतात. हा सापळा आकाराने लहान असून या सगळ्याची किंमत देखील कमी असते.