आमदार संग्राम जगतापांच्या पायाखालची वाळू सरकल्याने बेछूट आरोप !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- संग्राम जगताप यांच्या स्वीय सहाय्यकाने मनपाच्या आरोग्य केंद्रा वरून लस पळवून नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

त्या बद्दल मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना जाब विचारणे हा स्टंट आहे का ? काँग्रेसने असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्या लसीकरण प्रकरणातील दहशतीची पोल-खोल करणाऱ्या काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या

निर्भीडते पुढे जगताप यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने स्टंटमन असे संबोधत राष्ट्रवादी बेछूट आरोप करीत असल्याचे प्रत्युत्तर शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, अनंतराव गारदे, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील यांनी दिले आहे.

राष्ट्रवादीने काल काळे यांच्यावर स्टंटमॅन असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देणारे पत्रक काँग्रेसने काढले आहे. सय्यद, गारदे, गीते यांनी म्हटले आहे की, जगताप हे स्वतः बिळात लपले असून आपल्या गुंड कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून खोटे आरोप करत आहेत.

हे आरोप करताना ज्या कार्यकर्त्यांना त्यांनी पुढे केले आहे ते स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक हल्ला प्रकरणातील गुंड आरोपी आहेत. जे स्वतः कायदा-सुव्यवस्थेच्या यंत्रणेवर हल्ला करतात अशांना काळे यांच्यावर आरोप करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.

स्व.अनिलभैया राठोड यांच्या निधनानंतर नगर शहरामध्ये आपल्याला चुकीचे कृत्य केल्यानंतर जाब विचारणारे कोणी राहिले नाही. असा गोड गैरसमज राष्ट्रवादीचा झाला आहे.

मात्र शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काची लस लोकप्रतिनिधी स्वतः आपल्या पीएच्या माध्यमातून पळवून नेतो ही बाब गंभीर असून सर्वसामान्य नागरिकांसाठी भांडणे हा जर राष्ट्रवादीला काँग्रेसचा स्टंट वाटत असेल तर असा स्टंट नागरिकांसाठी दररोज करण्यासाठी काँग्रेस तयार असल्याचे काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

नगर शहरामध्ये किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने कोरोनाच्या संकट काळामध्ये कोरोनाग्रस्तांना बेड उपलब्ध करून देणे, जेवण देणे, किराणा किट देणे, ऑक्सिजन प्लांट उभारणी तसेच ऑक्सिजन बेड मनपाने उभे करावेत यासाठी महापालिकेत मुक्कामी राहून तीव्र आंदोलन करण्यात आले, लसीकरणाच्या गोंधळावर आवाज उठवण्यात आला.

पारनेरचे राष्ट्रवादीचे आ.निलेश लंके यांनी नगर शहरातील अनेक कोरोना रुग्णांना त्यांच्या कोविड सेंटरमध्ये बेड दिले. त्यांची सेवा केली. तसेच आ.रोहित पवार यांनी नगर शहरामध्ये येऊन सेंटर उभारणी केली. मात्र संग्राम जगताप शहराचे आमदार असून देखील त्यांनी शहरात काय दिवे लावले ? केवळ फोटोसेशन करत नगरकरांसाठी काही केले तर नाहीच, मात्र सर्वसामान्यांची लस पळविण्याचा प्रताप त्यांनी केला.

असा प्रताप करणारे, बिहार मधील दहशतीलाही लाजवणारे राज्यातील ते एकमेव आमदार असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. अरुण जगताप हे देखील आमदार आहेत. नगर शहरा बद्दल त्यांची देखील जबाबदारी आहे. मात्र कोरोना सुरू झाल्यापासून ते हरवले आहेत.

दोन आमदार असताना देखील आणि महानगरपालिकेत अनेक वर्षे सत्तेत असताना देखील त्यांना सर्वसामान्य नागरिकांसाठी साधे मनपाचे एक हॉस्पिटल उभे करता येऊ नये हे वास्तव काँग्रेसने मांडले आहे. खा. सुजय विखे पाटील यांनी देखील याबाबत काल वक्तव्य केले आहे.

अन्याय, दहशत, निर्भीडता, विकास, नागरी प्रश्न या मुद्द्यांवर बोलणाऱ्या किरण काळे आणि काँग्रेस यांना स्टंटमॅन म्हणणाऱ्यांनी कितीही राळ उठवली तरी देखील नगरकरांसाठी लढा उभारण्याचे काम काँग्रेस सातत्याने सुरू ठेवेल, असे खलिल सय्यद, अनंतराव गारदे, प्रवीण गीते यांनी म्हटले आहे.