Ahmednagar Breaking : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ व्यक्तीला राज्यपाल बनवा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking :  नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारे राज्याचे राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी आज अहमदनगरमध्ये स्नेहालय संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या युवा प्रेरणा शिबिराला हजेरी लावली.

या शिबिराच्या उद्घाटनावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मला निवृत्ती देत नाहीत अशी मिश्किल टिप्पणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. गिरीश कुलकर्णींसारख्या (Girish Kulkarni) व्यक्तींना राज्यपाल करावा अशी मागणी केली आहे. राज्यपालांनी केलेल्या या मागणीनंतर आता राज्यात अनेक चर्चांना जोर आलं आहे.

काय म्हणाले राज्यपाल

समाजाला ठीक करायचं असेल, पुढे जायचं असेल, तर अनेक गोष्टी कराव्या लागतात. अनेक जण सेवानिवृत्त होत आहेत, मला जबरदस्ती रिटायरमेंट दिलीच जात नाहीये, ती वेगळी गोष्ट.

मग कोण करणार? हा तरुण करेल – डॉ. गिरीश कुलकर्णी. यांना बघून मला वाटलं, नरेंद्र मोदीजी मला का राज्यपाल बनवत आहेत? अशा लोकांना बनवायचं ना, ज्यांनी मोठं काम केलंय, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

दरम्यान, मराठी माणसांच्या विरोधात वादग्रस्त विधानाने राजकीय अडचणीत आलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माफी मागितली होती. त्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला. गुजराती सांस्कृतिक फोरम या संस्थेच्या आयोजित कार्यक्रमात त्यांनी थेट स्थानिक संस्कृतीशी एकरूप झाले पाहिजे, तसेच महाराष्ट्रात असताना मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन केले होते.

राज्यपाल काय म्हणाले होते?

कधी कधी लोकांना मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये विशेषत: मुंबई आणि ठाणेमधून गुजराती आणि राजस्थानी लोकांना इथून काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते आर्थिक राजधानी म्हटलं जाणार नाही, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही कोश्यारींच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं सांगत हात झटकले होते, त्याचवेळी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण खुद्द कोश्यारींनी दिलं. त्यानंतर राज्यपालांचं विधान वैयक्तिक असून आम्ही त्यांच्याशी सहमत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं होतं.