जनतेच्या सहकार्याने अकोलेचा चेहरा बदलला !

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- गेली ४० वर्षे विकासकामे करताना अनेक संघर्ष करावे लागले, मात्र तालुक्याच्या जनतेने साथ दिल्यामुळे तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला. ८० वर्षात माझ्यावरील प्रेम तसुभर कमी झाले नाही.

कोरोना काळात काळजी घ्या. आपले कुटुंब, आपले गाव कोरोनामुक्त होण्यासाठी सतर्क रहा, असे आवाहन करतानाच तालुक्यातील आरोग्य प्रशासनाने सरपंच, महसूल, पोलीस यांचे अभिनंदन करणे आवश्यक असल्याचे मत माजी मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केले.

पिचड यांच्या वाढदिवसानिमित्त राजूर येथे रक्तदान शिबीर, कोविड योद्ध्यांचा सत्कार आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री वैभव पिचड, आदिवासी उन्नतीचे सचिव मंगलदास भवारी,

काशिनाथ साबळे, पंचायत समिती सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, उद्योजक नितीन गोडसे, राजू गोडसे, कैलासराव वाकचौरे, मुरली भांगरे, शंभू नेहे, सरपंच गणपत देशमुख, संतोष बनसोडे, गोकुळ कानकाटे, डॉ. मारुती भांडकोळी, डॉ. तानाजी लेंडे, डॉ. दिघे, डॉ. बाबासाहेब गोडगे,

प्राचार्या मंजुषा काळे, अशोक देशमुख, राजेंद्र कानकाटे, आयुब तांबोळी, पेसा ग्रामपंचायतचे चंद्रकांत गोंदके, पांडुरंग खाडे, आदिवासी विकास परिषदेचे विजय भांगरे, विजय लहामगे उपस्थित होते. याप्रसंगी पिचड म्हणाले, जगात व देशात कोरोना गतीने वाढत आहे.

त्यासाठी काळजी घ्या. मी लस घेतली तुम्हीही घ्या. लग्न कार्यात मंडप घालू नका. गर्दी वाढवू नका. पथ्य पाळा. डॉक्टरचा सल्ला घ्या. चुकीची औषधे घेऊन जीव गमवू नका. आदिवासी भागात बंगाली डॉक्टर फिरतात. त्यांच्याकडे लक्ष ठेवा.

आरोग्य विभागाने पोलिस कारवाई करण्याचे धाडस दाखवावे. तालुक्यात अकोले, राजूर, संमशेरपूर, ब्राम्हण वाडा, कळस, कोतूळ या ठिकाणी लोकसहभागातून कोरोना काळजी केंद्र सुरू आहेत. अतिशय चांगले काम सुरू असून या कामाची सरकारने दखल घेतली आहे.

वैभव पिचड सातत्याने पाठपुरावा करत असून त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. १० दिवस होम क्वारंटाईन राहावे लागले. आयुष्याच्या उतरणीला जात असताना जनतेने आपल्याला भरभरून प्रेम दिले. त्यामुळे समाजाच्या हिताचे निर्णय घेता आले.

आदिवासी व धनगर याबाबत संघर्ष करताना राज्यातील आदिवासी आमदारांनी साथ दिली. जीवात जीव असेपर्यंत तालुक्याच्या हितासाठी हाकेच्या अंतरावर असेल, असे भावूक उद्गार त्यांनी काढले. सूत्रसंचालन भास्कर येलमामे यांनी केले. आभार संतोष बनसोडे यांनी मानले.