घरात साप घुसला तर काय करावे? चावल्यानंतर कोणत्या उपाययोजना कराव्यात आणि विषारी सापाचे प्रकार कोणते? वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. कारण पावसाच्या दिवसांमध्ये सापांचा निवारा नष्ट झाल्यामुळे आणि बऱ्याचदा या दिवसांमध्ये पाणी तुंबलेले असते आणि काडी कचरा देखील घरांच्या अवतीभवती पडलेला असतो.  यामुळे साप घरात शिरण्याच्या घटना घडतात. सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण भारतात खूप मोठे असून एका आकडेवारीचा विचार केला तर सन 2000 ते 2019 या कालावधीमध्ये भारतात बारा लाख लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. साप म्हटले म्हणजे मानवाच्या दृष्टिकोनातून एक नुकसानकारक आणि जीविताला धोका निर्माण करणारा प्राणी असे साधारणपणे स्वरूप आहे.

परंतु तज्ञांच्या मते साप देखील माणसांना घाबरतात. परंतु सर्पदंशामुळे होणारे मृत्यू हे मानवाच्या निष्काळजीपणामुळे जास्त होतात. साप माणसा पासून दूर जायचा प्रयत्न करतात. तज्ञांच्या मते जर घरात साप आला तर दरवाजा आणि खिडक्या उघडे ठेवणे गरजेचे असून त्याला बाहेर निघण्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे.

परंतु घरात जर साप शिरला तर बहुतेक जण खिडकी आणि दरवाजे बंद करून त्याला शोधायचा प्रयत्न करतात व काठीने मारण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीमध्ये त्याला स्वतःचा बचाव करण्यासाठी दुसरा मार्ग राहत असल्यामुळे देखील सर्पदंश होऊ शकतो.सर्पदंशाचा विचार केला तर साधारणपणे 70 टक्के सर्पदंश हे बिनविषारी सापांमुळे होतात आणि 30 टक्के सर्पदंश हे विषारी सापांमुळे होतात.

 भारतातील प्रामुख्याने विषारी सापांचे प्रकार

1- मन्यार भारतामध्ये ज्या काही प्रमुख विषारी सापांच्या जाती आहेत त्यापैकी ही एक जात आहे. या जातीच्या सापाच्या काही उपजाती देखील असून यामध्ये प्रामुख्याने साधा मन्यार, पट्टेरी मण्यार आणि काळा मण्यार या जाती भारतामध्ये प्रामुख्याने आढळून येतात. दीड मीटर पर्यंत लांबी असलेला या जातीच्या सापाचे खवले हे डोक्याकडे आणि शेपटीकडे कमी कमी होत जातात.

2- घोणस या जातीचा साप हा प्रामुख्याने अजगरासारखा दिसत असल्यामुळे गोंधळ उडतो. परंतु या जातीच्या सापाला जर ओळखायचे असेल तर त्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावर साखळीसारख्या तीन समांतर रेषा व त्याचे तोंड हे बेडका सारखे असते. तसेच घोणस जातीचा साप जेव्हा फुत्कार मारतो तेव्हा कुकरच्या शिट्टी सारखा आवाज येतो. घोणस जातीच्या सापाचे विष अतिशय विषारी असते.

3- फुरसे हा भारतामध्ये सर्वत्र ठिकाणी दिसून येणारा विषारी साप असून त्याचा रंग तपकिरी, फिक्कट पिवळा व वाळू सारखा असतो. या जातीच्या सापाच्या पाठीच्या दोन्ही बाजूंवर एक एक फिकट पांढरी नागमोडी रेषा असते. हा साप अतिशय कमी लांबीचा असतो. परंतु विषारी देखील आहे.

4- किंग कोब्रा हा मोठ्या आकाराचा विषारी सर्प असून याची वास्तव्य प्रामुख्याने घनदाट जंगलांमध्ये आढळून येते. माणसाच्या खूप कमी संपर्कात येणारी ही सापाची जात असून याचा रंग हा ऑलिव्ह फळाप्रमाणे हिरवा, काळसर तपकिरी किंवा काळा असतो व पोट फिक्कट पिवळे पांढरे, खवले मऊ एक सारख्या आकाराचे असतात. पूर्ण वाढ झालेल्या किंग कोब्रा जातीच्या सापाचे डोके हे मोठे आणि वजनदार असते.

 घरात साप शिरला तर काय करावे?

यामध्ये जर आपण तज्ञांच्या मताचा विचार केला तर त्यांच्या मते बरेच लोक जेव्हा सापाला पाहतात तेव्हा त्याचे बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद करतात. त्यामुळे तो घरातून बाहेर पडणे त्याला शक्य होत नाही व तो घरातच कुठेतरी लपून बसायचा प्रयत्न करतो व त्यामुळे त्याला पकडणे खूप कठीण जाते.

परंतु अशावेळी जर तुम्हाला साप दिसला तर त्याच्या जवळ जाणे शक्य तितके टाळणे गरजेचे आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे घरात साप येऊ नये याकरिता घराजवळ कचरा साठू देऊ नये तसेच कचरा असेल तर त्यामुळे उंदीर येतात आणि उंदरांच्या शोधार्थ साप देखील घरात शिरतात. त्यामुळे घराची वारंवार स्वच्छता करणे गरजेचे आहे. तसेच बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये मातीचे घर असतात व त्यांना छिद्र किंवा बीळ असतात.

त्यामुळे त्यांना व्यवस्थित बंद करणे गरजेचे आहे. तसेच घरातील जे काही सांडपाणी असते त्याचे पाईप हे जाळी बसून वगैरे व्यवस्थित झाकणे गरजेचे आहे. तसेच रात्रीच्या वेळी घराभोवती प्रकाश असणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर घराच्या बाहेर  बाथरूम किंवा वॉशरूम असेल तर त्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे गरजेचे असून त्या ठिकाणी चांगल्या प्रकाशाची व्यवस्था देखील करणे महत्त्वाचे आहे.