‘फुले मेटाऱ्हायझियम ‘ हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी शाश्वत,स्वस्त व पर्यावरणपूरक पर्याय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra news : आरोग्यम धनसंपदा’ या पंक्तीशी सर्वच सहमत आहेत. मात्र,गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या आणि कीडनाशकांच्या अतिवापराचे घातक परिणाम दिसून येत आहेत. दिवसेंदिवस कॅन्सर ग्रस्तांची संख्या वाढत आहे.

मानवी आरोग्याबरोबरच जैवविविधतेचा समोतलही बिघडत आहे. त्यामुळे ‘जैविक शेती’कडे वळताना रसायनांचा वापर कमी करून जैविक खते व कीडनाशकांचा वापर ही आजच्या काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून कीटकशास्त्र विभागाने विविध प्रकारचे जैविक कीडनाशके उत्पादित केले आहेत.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत येणारे कृषि महाविद्यालय पुणे येथे असेच एक जैविक कीडनाशक ‘फुले मेटाऱ्हायझियम’ तयार केले जात असून ते विक्रीसाठी उपलब्ध आहे. मेटाऱ्हायझियमचा वापर हुमणी अळी, पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, मावा, फुलकिडे, तुडतुडे, इ. किडींच्या नियंत्रणासाठी केला जातो.

प्रामुख्याने, ऊस, भात, भुईमूग, मका, बाजरी, इ. खरीप हंगामातील पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करणाऱ्या हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी मेटाऱ्हायझियम हे प्रभावी जैविक कीडनाशक आहे.

हुमणी अळी ही बहुभक्षी किड आहे . महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये, पावसाळ्यात ऊस पीकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. आणि त्यामुळे ऊस पीकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होत आहे.

हुमणीमुळे होणारे नुकसान :

प्रथमावस्थेतील अळ्या पिकाची तंतुमुळे खातात. ती उपलब्ध नसल्यास सेंद्रिय पदार्थ खातात. तंतुमुळांचा फडशा पाडल्यानंतर मुख्य मुळे खाण्यास सुरू करतात. परिणामी झाड वाळते. एका झाडाचे मूळ कुरतडून खाल्ल्यानंतर हुमणी दुसऱ्या झाडाकडे वळते.

शेतात एका ओळीत झाडे वाळल्याचे दिसून येते. प्रामुख्याने ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यांमध्ये हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे जास्त नुकसान होते.हे नुकसान टाळण्यासाठी
पहिल्या पावसानंतरच हुमणी अळीच्या नियंत्रणावर लक्ष दिले पाहिजे.

मेटाऱ्हायझियम विषयी :

हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी वापरले जाणारे मेटाऱ्हायझियम हे बुरशीयुक्त जैविक कीडनाशक आहे.
मेटाऱ्हायझियम बुरशी हुमणी अळीच्या शरीरात शिरून उपजीविका करते.मेटाऱ्हायझियमच्या संपर्कात आलेली अळी साधारण १०-१५दिवसांत मरते.

मेटाऱ्हायझियम वापरण्याची पद्धत :

१) प्रति एकरी ऊस पीकासाठी ८ किलो फुले मेटाऱ्हायझियम शेणखतात मिसळून पीकास देणे.
२) प्रति लीटर पाण्यात ५ ग्रॅम ‘फुले मेटाऱ्हायझियम मिसळून रान वापश्यावर असताना ऊसाच्या खोडात आळवणी करणे.
जैविक घटकांचे उत्पादन व उपयोग या कर्यानुभवात्मक शिक्षण प्रकल्पाचे व्यवस्थापन डॉ. संतोष मोरे सर ,गौरी जवळकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे .यात वैभव झेंडे, आकाश आटोळे , शिल्पा गायकवाड, स्नेहल वाबळे ,ऋतुजा धुमाळ, निकिता नरसाळे हे विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.
या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी व उत्पादनांची खरेदी करण्यासाठी संपर्क:-
डॉ. संतोष मोरे (७५८८९५५५०१)
(प्राध्यापक, कृषी महाविद्यालय पुणे)

(कु.शिल्पा अरुण गायकवाड
विद्यार्थिनी ,कृषी महाविद्यालय पुणे)