मनपाच्या विरोधी पक्षनेते पदासाठी जोरदार रस्सीखेच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- गेल्या काही दिवसांपूर्वीच अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुका पार पडल्या होत्या. आता या निवडीनंतर विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याचे पत्र महापौरांनी भाजपचे नगरसेवक तथा माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांना दिले होते. परंतु, भाजपच्या प्रदेशध्यक्षांनीच ही नियुक्ती थांबविण्याचा आदेश दिला.

यामुळे महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. माजी महापौर बाबासाहेब वाकळे हे विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी नगरसेवकांच्या पाठिंब्याचे पत्र महापौरांकडे मंगळवारी सुपुर्द केले.

त्यांच्यापाठोपाठ भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी पाठिंब्यासाठी नगरसेवकांच्या सह्यांची मोहीम हाती घेतली असून, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांचे वरिष्ठांकडे प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

याबाबत निर्णय घेण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी शुक्रवारी (दि. १६) नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक महेंद्र गंधे, माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, गटनेत्या मालन ढोणे हे चोघे इच्छुक आहेत.

गटनेत्या ढोणे यांनी प्रदेशध्यक्षांकडून नाव सुचविल्यानंतरच विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती करावी, अशा आशयाचे पत्र महापौरांना सोमवारी दिले आहे. त्यानंतर मंगळवारी वाकळे यांनी नगरसेवकांच्या पाठिंब्याचे पत्र महापौरांकडे सुपुर्द केले.

यातच माजी सभापती मनोज कोतकर यांनी बुधवारी पाठिंब्यासाठी नगरसेवकांच्या सह्यांची मोहीम राबविली. अन्य नगरसेवकांशीही ते संपर्क करत आहेत. कोतकर हे राष्ट्रवादीकडून सभापती झाले होते. अवघ्या चार महिन्यांतच त्यांचे पद संपुष्टात आले.

त्यासाठी माजी महापौर वाकळे यांनी स्थायी सदस्यांच्या निवडीसाठी सभा घेण्याची तत्परता दाखविली. तेव्हापासून कोतकर व वाकळे यांच्यात संघर्ष आहे. तो विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती करताना आणखी तीव्र झाला आहे.